समन्वयातून दलित उद्योजकांचा विकास

By Admin | Updated: March 15, 2015 02:19 IST2015-03-15T02:19:15+5:302015-03-15T02:19:15+5:30

‘नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे बना’ आणि ‘संघर्षाऐवजी समन्वयातून विकास’ या मूलमंत्रानुसार दलित युवकांना सर्वोपरी मदत करून

Development of Dalit Entrepreneurs from Coordination | समन्वयातून दलित उद्योजकांचा विकास

समन्वयातून दलित उद्योजकांचा विकास

नागपूर : ‘नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे बना’ आणि ‘संघर्षाऐवजी समन्वयातून विकास’ या मूलमंत्रानुसार दलित युवकांना सर्वोपरी मदत करून त्यांना देशातील यशस्वी उद्योजकांच्या रांगेत उभे करण्याचे काम ‘डिक्की’ करीत आहे, असा विश्वास डिक्कीचे संस्थापक व चेअरमन पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केला.
संघर्षशील दलित समाजाच्या उत्थानासाठी स्थापन करण्यात आलेल्या दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीची (डिक्की) स्थापना १४ एप्रिल २००५ रोजी पुणे येथे झाली. ‘डिक्की’ला केंद्र सरकारने औद्योगिक संघटनेचा दर्जा दिला आहे. सरकारच्या पॉलिसी धोरणात सहभाग आहे. डिक्कीच्या यशस्वी दशकपूर्तीनिमित्त कांबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डिक्कीच्या दक्षिण क्षेत्राचे प्रमुख पद्मश्री रविकुमार नारा, उत्तर विभागाचे प्रमुख संजीव डांगी, नागपूर चॅप्टरचे संरक्षक अरुण खोब्रागडे व अध्यक्ष निश्चय शेळके उपस्थित होते.
१० वर्षांतील डिक्कीची उपलब्धी
कांबळे म्हणाले की, सर्व राज्यांमध्ये डिक्कीचे चॅप्टर असून पाच हजार सदस्य आहेत. आंबेडकर, फुले आणि शाहू यांच्या विचारांचा अवलंब केला आहे. द्रव्य नाही म्हणजे दारिद्र्य. ते दूर व्हावे, यावर डिक्कीचा भर आहे. दलित उद्योगांना खऱ्या संधी १९९० नंतर मिळाल्या आहेत. आता चेंबर दलितांना उद्योजक होण्यात हातभार लावत आहे. डिक्कीने १० वर्षांत शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यास सरकारला बाध्य केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि काही सरकारी विभाग वर्षभरात जवळपास सहा लाख कोटींच्या कच्च्या मालाची खरेदी करतात. एकूण खरेदीपैकी ४ टक्के खरेदी एसटी व एसटी उद्योजकांकडूनच करावी, असे धोरण डिक्कीने सरकारकडून करवून घेतले आहे. त्यामुळे दलित उद्योजकांना २४ हजार कोटींची हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. शिवाय २०० कोटींचा व्हेंचर फंड आणि १०० कोटींची वनबंधू कल्याण योजना निर्माण केली आहे. डिक्कीने भारताच्या कॅपिटल मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. डिक्की एसएमई व्हेंचर कॅपिटल फंडची सेबीकडे नोंद करून त्यातून ५०० कोटींचे भांडवल उभारून दलित उद्योजकांना मदत करणार आहे.
मुद्रा बँकेसाठी डिक्कीचा पाठपुरावा
मुद्रा बँकेच्या स्थापनेसाठी डिक्कीची महत्त्वाची भूमिका असून, अनुसूचित जाती-जमातीच्या उद्योजकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ५०० उद्योजकांना मुख्य उद्योजकांसोबत व्हेंडर आणि पुरवठादार म्हणून जोडले आहे.
पुणे, मुंबई, नागपूर आणि हैदराबाद येथे राष्ट्रीय स्तरावरील चार औद्योगिक प्रदर्शने आयोजित केली आहेत, शिवाय चार उद्योजकांना पद्मश्री हा नागरी सन्मान मिळाला आहे. तसेच ‘इग्नाईट’ नावाने उद्योजकता विकास कार्यक्रमाचे मॉडेल बनवून त्याद्वारे १०० दलित उद्योजक आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये तयार केले आहेत.
दलित उद्योजकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून डिक्की एसएमई पोर्टल सुरू केले आहे, शिवाय वूमेन विंग स्थापना करून दलित महिलांसाठी उद्योगाची द्वारे खुली केली आहेत. (प्रतिनिधी)
डिक्कीचा १० वर्षांचा रोडमॅप
रविकुमार नारा म्हणाले की, डिक्की पुढील १० वर्षांत दलित उद्योजकांना बिलिनिअर्स बनविणार आहे. हैदराबाद येथे स्थापन होणाऱ्या पहिल्या इनक्युबेशन सेंटरमध्ये २५ हजार दलित युवकांना उद्योजकीय प्रशिक्षण देणार आहे. तसेच दिल्ली, मुंबई आणि जमशेदपुर येथेही सेंटर उघडण्यात येणार आहे. पाच हजार दलित महिला उद्योजक आणि पाच हजार अनुसूचित जमातीतील उद्योजक डिक्की तयार करणार आहे. याशिवाय कास्टलेस सोसायटी, या उद्दिष्टांतर्गत समाजातील सर्व घटकांना घेऊन ‘रन फॉर कास्ट फ्री इंडिया’ ही वार्षिक दौड डिक्कीच्या प्रत्येक शाखेंतर्गत घेण्यात येईल.
टॅलेंट हंटचे आयोजन
दलित युवकांसाठी देशाच्या सर्व राज्यातील इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंट कॉलेजमध्ये टॅलेंट हंटचे आयोजन करण्यात येणार आहे. युवकांना उद्योजक होण्यासाठी हवे ते मार्गदर्शन आणि मदत डिक्की करणार आहे.
बुटीबोरी येथे एक्सलन्स सेंटर
उद्योगांना कुशल कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी डिक्की २०२५ पर्यंत ५० लाख दलित युवक-युवतींना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या बुटीबोरी येथे ३० जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बुटीबोरी येथे स्कील डेव्हलपमेंटसाठी एक्सलन्स सेंटर उभारण्यात येणार आहे.

Web Title: Development of Dalit Entrepreneurs from Coordination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.