शाैचालये असूनही उघड्यावर जाणे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:13 IST2020-12-30T04:13:45+5:302020-12-30T04:13:45+5:30
राम वाघमारे लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : उघड्यावरील घाणीचा नायनाट करण्यासाठी शासनाने नागरिकांना घराेघरी शाैचालयांचे बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले. ...

शाैचालये असूनही उघड्यावर जाणे सुरूच
राम वाघमारे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नांद : उघड्यावरील घाणीचा नायनाट करण्यासाठी शासनाने नागरिकांना घराेघरी शाैचालयांचे बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले. अनेकांनी अनुदाानाचा लाभ घेत शाैचालये बांधली तर काहींनी नुसताच देखावा केला. घरी शाैचालये असूनही उघड्यावर शाैचास जाणे सुरू असल्याचे चित्र भिवापूर तालुक्यातील काही गावांमध्ये आजही बघावयास मिळते. त्यामुळे हागगणदारीमुक्त गाव अभियानाचा पुरता फज्जा उडाला आहे.
उघड्यावर शाैचास जाणाऱ्यांमध्ये भिवापूर तालुक्यातील नांद, सायगाव, भगवानपूर, खाेलदाेडा, खरकाडा, वणी, लाेणारा, आलेसूर, पांजरेपार, चिखलापार, पिरावा, पाेळगाव, धामणगाव ही गावे आघाडीवर असून, या गावांमध्ये प्रवेश करणाऱ्या राेडलगत घाणीचे दर्शन हाेते. विशेष म्हणजे, यासह इतर गावांमधील नागरिकांना शासनाने शाैचालय बांधण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून अनुदान दिले आहे. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत नागरिकांनी शाैचालयांचा नियमित वापर करावा, यासाठी जनजागृतीही केली आहे.
उघड्यावर शाैचास जाणे बंद व्हावे, म्हणून मध्यंतरी जिल्हा परिषद प्रशानाच्यावतीने ‘गुड माॅर्निंग’ पथकाची निर्मिती करण्यात आली हाेती. त्यानंतर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही माेहीम जाेपर्यंत सुरू हाेती, ताेपर्यंत काहींनी शाैचालयांचा नियमित वापर केला. माेहीम थांबताच नागरिकांचे उघड्यावर शाैचास जाणे सुरू झाले. त्यामुळे प्रशासनाने इतर कामे साेडून हीच माहीम वर्षभर राबवावी काय, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
...
साहित्य ठेवण्यासाठी वापर
काही गावांमधील खासगी शाैचालयांची पाहणी केली असता, नागरिक त्या शाैचालयांचा वापर घरातील निरुपयाेगी साहित्य व शेतीपयाेगी अवजारे ठेवण्यासाठी करीत असल्याचे आढळून आले. ग्रामीण भागात सार्वजनिक शाैचालये नाहीत. ज्या गावांमध्ये ती आहेत, त्यांची अवस्था साफसफाईअभावी दयनीय झाली आहे. ही बाब स्थानिक प्रशासनाला माहीत आहे. मात्र, कुणीही कारवाई करण्याच्या भरीस पडत नाही.
....
निर्मल ग्राम नावालाच
हागणदारीमुक्त गाव अभियसानाला २०१३ पासून वेग आला आला. त्यातच शासनाने निर्मल ग्राम अभियान राबवून यात चांगली कामगिरी बजावणाऱ्या ग्रामपंचायतींना राेख बक्षिसेही व अतिरिक्त विकास निधीही दिला. प्रशासनाची पाठ फिरताच ग्रामीण भागातील कचरा व घाणीची समस्या ‘जैसे थे’च झाली. त्यामुळे शासनाचे निर्मल ग्राम अभियान नावालाच राहिले आहे.