Design to create Hindu Nation behind CAA: Kumar Ketkar | सीएएमागे हिंदू राष्ट्र निर्मितीचे मनसुबे : कुमार केतकर

सीएएमागे हिंदू राष्ट्र निर्मितीचे मनसुबे : कुमार केतकर

ठळक मुद्देमनसुबे अहिंसेतून उधळा : सीएए, एनआरसी, एनपीआरविषयी संविधान जनजागरण


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीएए, एनआरसी आणि एनपीआरमागे मोदी आणि शहा यांचा हिंदू राष्ट्रनिर्मितीचा डाव आहे, असा आरोप करीत तो एकजुटीतून आणि अहिंसेतून उधळा. हिंसेच्या मार्गाने जाऊ नका, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.
फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर सोशल जस्टीस्ट, सेक्युलॅरिजम अँड डेमोक्रेसी नावाने ६१ संघटनांनी एकत्रित येऊन आयोजित केलेल्या सीएए, एनआरसी आणि एनपीआर यासंबंधातील संविधान जनजागरण सभा मंगळवारी वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडली. त्या प्रसंगी केतकर बोलत होते. अध्यक्षस्थनी युजीसीचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात होते. नगरसेवक प्रफुल्ल गुडधे आणि जमाते इस्लामी ऑफ हिंदचे अन्वर सिद्धीकी उपस्थित होते.
कुमार केतकर पुढे म्हणाले, १९४७ नंतर देशाला पुन्हा दुसऱ्यांदा विभाजनाकडे नेले जात आहे. यामागे हिंदूराष्ट्र निर्मितीचा उद्देश आहे. त्यासाठी सीएएचा आधार घेतला जात आहे. सावरकरांच्या मनोवृत्तीनुसार राज्यघटनेत हिंदू राष्ट्र शब्द आणण्याचा कट देशात रचला जात आहे. ३७० कलमापाठोपाठ सीएए लागू करण्यासाठी सरकारची घाई आहे. काश्मीरच्या मुद्यावर देशात दंगली होतील, अशी अपेक्षा सरकारला होती. मात्र नागरिकांनी ही परिस्थिती संयमाने हाताळली. सीएए लागू करून पुन्हा देशभर दंगे भडकतील, अशी अपेक्षा मोदी-शहा यांना होती. दंगली भडकल्यावर देशात आणीबाणी लागू करून आपले इप्सित साध्य करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र त्यांच्या मनातील होऊ देऊ नका. गांधींच्या अहिंसेच्या मार्गानेच उत्तर द्या. सामाजिक एकजूट करा. देशाचे दुसरे विभाजन होऊ देऊ नका.
लोकमान्य टिळकांनी वंगभंग चळवळ सुरू केली. त्यातील हिंदू-मुस्लिम एकजूट प्रारंभीच्या काळात सावरकरांनाही मान्य होती. मात्र नंतर त्यांची विचारधारा बदलली, अशी टीका त्यांनी केली.
सीएए हा मनुस्मृतीचा उत्तरार्ध असल्याचा आरोप करून केतकर पुढे म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही ती टिकविण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो अयशस्वी ठरला. तीच विचारसरणी आता धर्माचा आधार घेऊन पुढे येत आहे. स्थलांतरित मुस्लिमांना देशात परत घेणार नाही हे अमित शहांचे संसदेतील विधान हीच सरकारची भूमिका आहे. जगात ५७ मुस्लिम राष्ट्र असून या सर्व राष्ट्रात ३ कोटी हिंदू वास्तव्यास आहेत. त्यांच्या माध्यमातून मोठी गंगाजळी देशाला मिळते. असे झाले तर ती राष्ट्रेही भारतीय हिंदूंना देशाबाहेर काढतील. गंगाजळी बुडेल, याचा विचार करण्याची गरज आहे.
सुखदेव थोरात म्हणाले, मुस्लिम धर्मियांना नागरिकत्व न देणे ही सीएएची भूमिका भेदभावपूर्ण आहे. त्यामागे राजकीय हेतू आहे. यापूर्वी धर्माच्या आधारे नागरिकत्व देण्याचा प्रकार कधीच घडला नाही. हे प्रथमच घडत असल्याने घटनात्मक तरतुदीचे उल्लंंघन आहे. नागरिकांना भ्रमित करून हिंदुझमच्या नावाखाली ब्राह्मणवाद थोपविण्याचा प्रयत्न याआड होत आहे. ब्राह्मणवादाचा शिकार झालेले दलित मुस्लिम,ओबीसी हिंदूही त्यांना साथ देतात, अशी टीका त्यांनी केली. प्रफुल्ल गुडधे आणि अन्वर सिद्धीकी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी संविधान प्रास्ताविका वाचन झाले. विद्यार्थ्यांनी गीते सादर केली. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Web Title: Design to create Hindu Nation behind CAA: Kumar Ketkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.