Deputy Commissioner of Police, Raushan | नागपुरातून पोलीस उपायुक्त रौशन यांची बदली
नागपुरातून पोलीस उपायुक्त रौशन यांची बदली

ठळक मुद्देअनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा : उस्मानाबाद अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांची नागपुरातून बदली झाली आहे. भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) राज्यातील चार पोलीस अधीक्षक / उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने मंगळवारी जारी केले. या यादीत रौशन यांचेही नाव आहे.
आयआयटी खरगपूरचे विद्यार्थी असलेले उपायुक्त रौशन यांनी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड इलेक्ट्रीकल्सचा अभ्यासक्रम २००७ मध्ये पूर्ण केला. चांगल्या पगाराची नोकरी सोडून ते भारतीय पोलीस सेवेत रुजू झाल्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये ते नागपुरात बदलून आले. वर्षभराच्या कालावधीत हसतमुख, मितभाषी आणि सौजन्यशील अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. त्यांना प्रारंभी वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी जबाबदारी सोपविली होती. फेब्रुवारी २०१९ पर्यंत अर्थात् सहा महिन्यांच्या सेवाकाळात नागपुरातील विस्कळीत वाहतुकीला लगाम घालण्याची जबाबदारी रौशन यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली. त्यानंतर त्यांना परिमंडळ चारचे उपायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले. येथेही त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. कोणत्याही गुन्ह्याचा तपास खोलात जाऊन करण्याची त्यांची शैली आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावतानाच त्यांनी आपल्या नागपुरातील १२ महिन्याच्या सेवाकाळात घरून निघून गेलेल्या, फूस लावून पळवून नेण्यात आलेल्या ५५० अल्पवयीन मुलामुलींना शोधून त्यांच्या पालकांच्या हवाली करण्याची कामगिरी बजावली.
गृह विभागाने राज्यातील चार अधीक्षक / पोलीस उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. त्यात उपायुक्त रौशन यांचेही नाव आहे.
अतिरिक्त अधीक्षक अन् अधीक्षक
२०१३ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले रौशन यांनी परभणीला प्रशिक्षणार्थी सेवाकाळ पूर्ण केला. त्यानंतर २०१६-१७ मध्ये उस्मानाबादला अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिल्यानंतर त्यांची याच पदावर वसईला बदली झाली. ऑगस्ट २०१८ मध्ये ते नागपुरात बदलून आले आणि आता वर्षभराच्या सेवाकाळानंतर ते आता उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत.


Web Title: Deputy Commissioner of Police, Raushan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.