ग्लेनमार्क फार्माची ४० एकर जागेची मागणी
By Admin | Updated: September 28, 2016 03:21 IST2016-09-28T03:21:34+5:302016-09-28T03:21:34+5:30
औषध क्षेत्रातील ग्लेनमार्क फार्मा ही भारतीय कंपनी मिहान-सेझमध्ये उत्पादन करण्यास उत्सुक आहे.

ग्लेनमार्क फार्माची ४० एकर जागेची मागणी
मिहान-सेझ : लहान आयटी कंपन्या उत्सुक
नागपूर : औषध क्षेत्रातील ग्लेनमार्क फार्मा ही भारतीय कंपनी मिहान-सेझमध्ये उत्पादन करण्यास उत्सुक आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मिहान-सेझची पूर्वीच पाहणी केली असून सेझमध्ये ४० एकर जागेची मागणी केली आहे. कंपनीने यासंदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) प्रस्ताव दिला आहे. काही दिवसातच जागेला मंजुरी मिळणार आहे.
एमएडीसीने सेझमध्ये जागेचे दर वाढविले आहेत. आता ६० लाखांऐवजी प्रति एकर जागेचा दर ६९ लाख रुपये एकर आहे. कंपनीला हव्या असलेल्या जागेची एकूण किंमत २७ कोटी ६० लाख एवढी आहे. औषध निर्माण क्षेत्रातील पदवीधर व पदव्युत्तर आणि तज्ज्ञांना या कंपनीत उच्चपदस्थ नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
आयटी कंपन्यांतर्फे जागेची खरेदी
मिहान-सेझमध्ये वर्ष २०१६ मध्ये १२ लहानमोठ्या कंपन्यांनी जागा विकत घेतली आहे.
मध्यवर्ती इमारतीत आठ आयटी कंपन्या कार्यान्वित झाल्या आहेत. याशिवाय आणखी ३ आयटी कंपन्यांनी मिहान-सेझमध्ये जागेची मागणी केली आहे. या कंपन्यांचा प्रस्ताव सध्या प्रलंबित असून त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नवीन कंपन्यांच्या उद्योग निर्मितीमुळे मिहान-सेझमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचे श्रेय स्थानिक नेत्यांना असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय यावर्षीच्या जुलै महिन्यात एसईझेडबाहेर एनडीएसपी स्पाईसेस आणि एसवायएस लॉजिस्टिकने प्रत्येकी एक एकर जागा खरेदी केली आहे. दुबई येथील नामांकित परफ्यूम उत्पादक कंपनीने एसईझेड या निर्यातीत क्षेत्रात २.५ एकर जागा खरेदी केली आहे.(प्रतिनिधी)
‘एचसीएल’ला ५० एकर जागा
एवढेच नव्हे तर सप्टेंबर महिन्यात आयटी क्षेत्रातील नामांकित हिंदुस्थान कॉम्प्युटर लिमिटेडने (एचसीएल) मिहान-सेझमध्ये ५० एकर जागा खरेदीचा लीज करार केला आहे. या करारामुळे मिहानच्या विकासात पुन्हा मानाचा तुरा रोवला गेला आहे. कंपनी मिहानमध्ये स्कील डेव्हलपमेंट सेंटरची उभारणी करणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे.भारतातील आघाडीची आयटी कंपनी टीसीएस मिहान-सेझमध्ये आधीच कार्यरत आहे. याशिवाय इन्फोसिसने १४३ एकर जागेवर बांधकाम सुरू केले आहे. तसेच टेक महिन्द्रचे बांधकाम जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
‘एआयएमडीए’तर्फे जागेची पाहणी
वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या मिहान-सेझमध्ये उत्पादन युनिट सुरू करणार आहेत. या संदर्भात भारतीय वैद्यकीय उपकरणे असोसिएशनच्या (एआयएमडीए) पदाधिकाऱ्यांनी पूर्वीच जागेची पाहणी केली आहे.