दिल्लीच्या ठकबाजांची मोबाईलच्या माध्यमातून 'स्मार्ट लूट
By नरेश डोंगरे | Updated: August 5, 2025 20:19 IST2025-08-05T20:02:56+5:302025-08-05T20:19:51+5:30
मैत्री करून केली चोरी, नंतर घातला गंडा : रेल्वे पोलिसांची चिकाटी, १४ महिन्यानंतर बांधल्या मुसक्या

Delhi's fraudsters 'smart loot' through mobile phones
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धावत्या ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसोबत मैत्री करून आधी त्याचा मोबाईल लंपास करायचा. नंतर, त्या मोबाईलचा गैरवापर करून सोने खरेदी करून लाखोंचा गंडा घालायचा, अशी कार्यपद्धती असेलल्या दिल्लीतील ठगबाजांच्या टोळीतील एका भामट्याच्या येथील रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. एखाद्या सिरियल मधील वाटावी, अशी या भामट्याची ठगबाजीची स्मार्ट कार्यपद्धती असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
ग्वालियरच्या शताब्दीपूरम येथे राहणारे अनुजसिंग कुशवाह (वय ४२) हे ७ मे २०२४ रोजी नागपूर ते ग्वालियर जाण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक १ वर उभे होते. कॉलेजियन वाटणाऱ्या दोन भामट्यांनी त्यांच्याशी सलगी साधली. नंतर गाडी फलाटावर आल्याचे पाहून स्वत:च्या फोनची बॅटरी डाऊन झाल्याची थाप मारत कुशवाह यांचा मोबाईल ताब्यात घेतला आणि कुशवाह अन्य प्रवाशांच्या गर्दीत गाडीत शिरत असताना हे भामटे पसार झाले. गाडी सुटल्यानंतर कुशवाह यांनी कोचमध्ये त्यांची शोधाशोध केली मात्र ते काही आढळले नाही.
कुशवाह यांच्या मोबाईलच्या कव्हरमध्ये दोन एटीएम कार्ड आणि यूपीआय कोड होता. कार्डचा वापर करून या भामट्यांनी रक्कम काढली. नंतर नागपूरच्या एका सराफा दुकानात जाऊन ३ लाख, २५ हजारांचे सोने खरेदी केले. त्याचे यूपीआय पेमेंट कुशवाह यांच्या मोबाईलचा वापर करून केले. कुशवाह ग्वालियरला पोहचल्यानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. प्रकरणाचा तपास करताना पोलीस निरीक्षक गाैरव गावंडे आणि सहकाऱ्यांनी आधी रेल्वे स्थानकावरचे आणि नंतर एटीएम तसेच सराफाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज काढले. त्यावरून आरोपींचा शोध सुरू होता. मात्र, १४ महिने होऊनही ते काही हात लागले नव्हते.
१४ महिन्यानंतर पुन्हा नागपूर
या घटनेच्या १४ महिन्यानंतर हे भामटे पुन्हा ३० जुलै २०२५ रोजी नागपूर रेल्वे स्थानकावर आले आणि सावज शोधत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले. कंट्रोल रूमच्या माध्यमातून ही माहिती कळताच रेल्वे पोलिसांनी संशयीत आरोपी आझाद उर्फ नासीर हुसैन (वय ३२, रा. बवाना, दिल्ली) याला ताब्यात घेतले. चाैकशीत त्याने 'बाजीराव'समोर शरणागती पत्करत चोरीची कबुली दिली. ठगबाजी करून विकत घेतलेले सोने दिल्लीतील एका सराफाला विकल्याचीही माहिती दिली. त्यानुसार, त्याच्यासोबत दिल्लीत जाऊन पोलिसांनी १२ ग्राम सोन्याची लगडी जप्त केली.
आणखी दोन गुन्हे
पोलिसांकडून प्रसाद मिळताच आरोपीने याआधीही अशा पद्धतीने नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यावरून त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करून त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. रेल्वे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या निर्देशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय अधिकारी पांडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोनि गौरव गावंडे यांच्या नेतृत्वात पीएसआय दिलीप सुपले, नायक संजय पटले, हवलदार पुष्पराज मिश्रा, अमोल हिंगणे, अमित त्रिवेदी आणि राजेश पराते यांनी ही कामगिरी बजावली.