दिल्लीची तरुणी अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST2021-02-14T04:09:01+5:302021-02-14T04:09:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - शिक्षणाच्या निमित्ताने नागपुरात राहणाऱ्या दिल्लीच्या एका तरुणीचा शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्रीदरम्यान भीषण अपघातात मृत्यू ...

Delhi girl killed in accident | दिल्लीची तरुणी अपघातात ठार

दिल्लीची तरुणी अपघातात ठार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - शिक्षणाच्या निमित्ताने नागपुरात राहणाऱ्या दिल्लीच्या एका तरुणीचा शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्रीदरम्यान भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघातात तिचा दुचाकीचालक मित्र जखमी झाला. रितिका मनोहर वेदवाल (वय २७) असे मृत तरुणीचे तर गोल्डी ऊर्फ आशिष संजय उमरे (वय ३०) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

नवी दिल्लीतील शारदापुरीच्या रमेशनगरात राहणारी रितिका सधन कुटुंबातील तरुणी आहे. तिचे आईवडील निवृत्त सरकारी अधिकारी असल्याचे समजते. ती एलएलबीच्या तृतीय वर्षाला शिकत होती. जामठ्याच्या वृंदावन सिटीतील सदनिकेत ती राहायची. कमाल चाैकात राहणारा गोल्डी उमरे चार वर्षांपूर्वी दिल्लीला नोकरी करायचा. त्यावेळी त्याची रितिकासोबत ओळख झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर एलएलबीच्या शिक्षणाच्या निमित्ताने रितिका गोल्डीसोबत तीन वर्षांपूर्वी नागपुरात आली. क्लासवगैरे आटोपल्यानंतर हे दोघे सोबत फिरायचे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी हे दोघे मध्यरात्रीपर्यंत सोबत फिरले, नंतर गोल्डी रितिकाला तिच्या जामठ्यातील सदनिकेत सोडण्यासाठी डीएल ०६-एसबीए ९६२५ क्रमांकाच्या दुचाकीने शुक्रवारी मध्यरात्री निघाला. परसोडी गावाजवळच्या सीआयसीआरच्या गेटसमोर एका भरधाव वाहनाने दुचाकीला कट मारला. त्यामुळे हे दोघे रस्त्यावर पडले. मागून आलेल्या एका ट्रकचे चाक रितिकावरून गेल्याने रितिकाचा मृत्यू झाला. गोल्डीला मात्र जुजबी दुखापत झाली. मात्र त्याला जबर मानसिक धक्का बसला. अपघाताची माहिती कळताच बेलतरोडी पोलीस घटनास्थळी पोहचले. नंतर त्यांनी गोल्डीच्या बयानावरून रितिकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.

----

आईवडील दिल्लीहून निघाले

पोलिसांनी रितिकाच्या अपघाती मृत्यूचे वृत्त तिच्या आईवडिलांना कळविले. ते दिल्लीहून नागपूरकडे निघाले. रात्रीपर्यंत ते नागपुरात पोहोचण्याची शक्यता बेलतरोडी पोलिसांनी वर्तविली आहे.

----

Web Title: Delhi girl killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.