गोव्यात कॅसिनो फ्रेंचायसीचे आमीष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 12:12 AM2020-12-17T00:12:04+5:302020-12-17T00:13:50+5:30

Deception of students, lure of casino franchise in Goa, crime newsगोव्यात कॅसिनो व आयटीसी सिगारेट कंपनीची फ्रेंचायसी मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंडांच्या टोळीने विद्यार्थ्यांची ३८ लाख रुपयांनी फसवणूक केली.

Deception of students by showing the lure of casino franchise in Goa | गोव्यात कॅसिनो फ्रेंचायसीचे आमीष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक

गोव्यात कॅसिनो फ्रेंचायसीचे आमीष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्दे३८ लाख रुपये हडपले : पैसे परत मागताच धमकावले

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : गोव्यात कॅसिनो व आयटीसी सिगारेट कंपनीची फ्रेंचायसी मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंडांच्या टोळीने विद्यार्थ्यांची ३८ लाख रुपयांनी फसवणूक केली. पैसे परत मागितल्यावर विद्यार्थ्यांना धमकाविण्यात आले. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. आरोपींमध्ये सुहास ठाकूर, मुन्ना यादव, प्रज्वल ढोरे, वात्या, धीरज रूपचंदानी व श्रीओम गौतम यांचा समावेश आहे.

चंद्रपूर येथील २१ वर्षीय हितेश भरडकर अंबाझरीच्या हिलटॉप येथे किरायाने राहतो. तो कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याची ऑगस्ट २०१९ मध्ये सुहास ठाकूर याच्याशी ओळख झाली. ठाकूर कुख्यात गुन्हेगार आहे. सुहास ठाकूर याने हितेश व त्याच्या मित्रांना आमिष दाखविले. ठाकूर याने आपले गोव्यात कॅसिनो, वीट भट्टा व आयटीसी सिगारेट कंपनीची एजन्सी असल्याचे सांगितले. त्याने हितेश व त्याच्या मित्रांना आयटीसी कंपनीत काम देण्याचे व वीट भट्टा व कॅसिनोत भागीदारी देण्याचे आमिष दाखविले. ठाकूर हा पूर्वी एमएलएम कंपनीत काम करीत होता. त्याची आलिशान वागणूक बघून हितेश व त्याचे मित्र आकर्षित झाले. एक महिन्याच्या आत ठाकूरने त्यांच्याकडून ३८ लाख रुपये घेतले. काही कालावधीनंतर पीडित विद्यार्थी सुहासकडे कंपनीच्या लाभाचा वाटा व आयटीसी कंपनीत काम मागण्यास गेले. परंतु सुहासने त्यांना टाळल्याने त्यांचा संशय बळावला. त्यामुळे पीडित विद्यार्थी पैसे परत करण्याची मागणी करू लागले. सुहास ठाकूर या विद्यार्थ्यांना चाकू व माऊझरचा धाक दाखवून धमकावू लागला. जीवाने मारण्याची धमकी देत होता. सुहास सक्करदरा येथील गुंडांना घेऊन हितेशच्या फ्लॅटवर येत होता. सुहासचा भाऊ सट्टा अड्डा चालवितो. हितेशने फेब्रुवारी महिन्यात अंबाझरी ठाण्यात तक्रार दाखल केली. गुंडांच्या दहशतीमुळे व लॉकडाऊनच्या कारणाने हितेशचे मित्र घरी निघून गेले. काही दिवसांनी परतल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. पण पोलिसांकडून होत असलेल्या टाळाटाळीमुळे मंगळवारी विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली. आयुक्तांनी तात्काळ अंबाझरी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

कर्ज काढून सुहासला पैसे दिले

पीडित विद्यार्थ्यांनी सुहास व त्याच्या साथीदारांच्या आमिषाला बळी पडून अवैध सावकाराकडून कर्ज घेतले. हितेशचे वडील शेतकरी आहेत, तर त्याचे दोन सहकारी मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला वाहन व दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले. त्यानंतर ते अवैध सावकाराकडे गेले. आता सावकार त्यांच्या घरी जाऊन पैशासाठी तगादा लावत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नातेवाईक तणावात आहेत. सुहासने नागपूरसह विदर्भातील अनेक लोकांना फसविले आहे. काही युवतीसुद्धा त्यांच्या शिकार ठरल्या आहेत.

Web Title: Deception of students by showing the lure of casino franchise in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.