नागपूर : सांस्कृतिक क्षेत्र हा अतिशय संवेदनशील विषय आहे आणि तेवढाच मनस्वीही. तब्बल आठ महिन्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना मोकळीक देण्यात आली असतानाही आणि त्या निर्णयाला महिना पूर्ण हाेत असतानाही अद्याप एकाही कार्यक्रमाचे आयोजन झालेले नाही. त्यामुळे, २०२० हे वर्ष विना सांस्कृतिक आयोजनानेच जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२०२० चा समारोप विना कल्चरल ॲक्टिव्हिटीजने होणार, हे बहुदा न पटण्यासारखे आहे. त्याचे कारण, शहरातील काही सांस्कृतिक संस्था सातत्याने गायन, नृत्य व नाट्याचे आयोजन करत असतात. टाळेबंदीमुळे या संस्थांनी गायनाचे कार्यक्रम आभासी माध्यमाद्वारे सादर केले आणि आताही केले जात आहेत. मात्र, आभासी माध्यमाचाही कंटाळा येत असल्याचे चित्र आहे आणि त्याच
पार्श्वभूमीवर डिसेंबरपासून सांस्कृतिक कार्यक्रमांचे जाहीर कार्यक्रम करण्याची तयारी सुरू झाली आहे. तालमींना वेग चढला असून, वाचन, अभिनय, गायन, नृत्य आदी प्रकारांच्या महोत्सवांची तयारी सुरू झाली आहे. हे सगळे महोत्सव अगदी लहान स्वरूपातील असले तरी रसिकांना घराबाहेर काढण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत.
* फर्स्ट बेल ऑन स्टेज आणि शुभास्ते पन्थान:
राष्ट्रभाषा परिवारतर्फे दहा बारा वर्षापासून सुरू असलेला फर्स्ट बेल ऑन स्टेज हा उपक्रम यंदा टाळेबंदीमुळे रखडला. नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम रंगकर्मींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. याचे आयोजन डिसेंबरमध्ये होत असल्याची घोषणा झाली आहे तर मेराकी थिएटरच्या वतीने गेल्या वर्षापासून सुरू झालेला शुभास्ते पन्थान: हा त्याच पठडीतला उपक्रम पाठोपाठ होणार आहे.
* दरमहा एकांकिका महोत्सव
संजय भाकरे फाऊंडेशनच्यावतीने दरमहा एकांकिका महोत्सवात एकांकिकांसोबतच व्याख्यान आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. टाळेबंदीत हा महोत्सव थांबला आहे. या महोत्सवाला पुन्हा चालना देण्यासाठी फाऊंडेशनच्या तयारीला वेग चढला आहे. अशाच प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन बहुुजन रंगभूमीतर्फेही होत असते.
* गायनाचे कार्यक्रम
शहरात गायनाचे कार्यक्रम करणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत. हार्मनी, हार्टबीट सारख्या या संस्था सध्या ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. आता या संस्थांनीही २०२०ला निरोप देणारे आणि नव्या वर्षाचे स्वागत करणाऱ्या कार्यक्रमांसाठी कंबर कसली आहे.
.....................