नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, नागपूर कार्यालयात धमकीचे तीन फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 13:48 IST2023-01-14T13:42:50+5:302023-01-14T13:48:23+5:30
गडकरी यांचे कार्यालय व निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढविली

नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, नागपूर कार्यालयात धमकीचे तीन फोन
योगेश पांडे/दयानंद पाईकराव
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी धमकीचे तीन फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवून फोन करणाऱ्याचा तपास सुरु केला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपुरातील खामला चौकात ऑरेंजसिटी हॉस्पीटलसमोर जनसंपर्क कार्यालय आहे. शनिवारी त्यांच्या या कार्यालयात धमकीचे फोन आले. यात गडकरींना पेशांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली असून पोलिसांनी मात्र फोनवर नेमकी काय धमकी दिली हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.
कार्यालयात सकाळी ११.२९ वाजता पहिला फोन आला. त्यानंतर आणखी दोन फोन आले. दुसरा फोन ११.३५ वाजता तर तिसरा फोन हा १२.३२ वाजता आला. हा प्रकार झाल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गडकरींच्या खामला चौक येथील कार्यालयात आणि त्यांच्या निवासस्थानी सुरक्षाव्यवस्था वाढविली आहे. धमकी देणारा फोन नेमका कोणी केला याचा शोध गुन्हे शाखेने सुरु केला आहे.
गडकरींच्या सुरक्षेची पुरेपुर काळजी घेऊ
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी देणारे तीन फोन त्यांच्या कार्यालयात करण्यात आले आहेत. हे फोन नेमके कोणी केले याचा तपास पोलिस करीत असून बीएसएनएलकडून कॉल रेकॉर्ड डिटेल्स मागविण्यात आले आहेत. तसेच सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून गडकरींचे कार्यक्रम असलेल्या ठिकाणी सुरक्षेची पुरेपुर काळजी घेण्यात येईल.
- राहुल मदने, पोलिस उपायुक्त, नागपूर शहर