Death of soldier on duty during an India-Bangladesh cricket match | भारत-बांगलादेश क्रिकेट सामना दरम्यान कर्तव्यावरील सहायक फौजदाराचा मृत्यू
भारत-बांगलादेश क्रिकेट सामना दरम्यान कर्तव्यावरील सहायक फौजदाराचा मृत्यू

ठळक मुद्देहृदयविकाराचा धक्का जामठा परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारत आणि बांगलादेशदरम्यान होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्तासाठी जामठा मैदान परिसरात तैनात असलेले सहायक फौजदार (एएसआय) मदार शेख यांचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
मदार शेख पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. रविवारी भारत-बांगलादेश दरम्यान जामठा येथे एकदिवसीय क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. त्याच्या बंदोबस्तासाठी सकाळपासूनच पोलीस तैनात करण्यात आले होते. एएसआय मदार शेख हेदेखील सहकाऱ्यांसह जामठा येथे बंदोबस्तासाठी गेले होते. दुपारी १२ च्या सुमारास वरिष्ठ पोलीस अधिकारी कुणाची कुठे तैनाती द्यायची, याबाबत चर्चा करीत होते. त्यावेळी मदार शेख स्टेडियमच्या जवळ लावलेल्या पेंडालमध्ये कर्तव्यावर होते. अचानक चक्कर येऊन ते खाली पडले. त्यामुळे सहकारी पोलिसांनी त्यांना पाणी देऊन विचारणा केली.
छाती दुखत असल्याचे सांगितल्यामुळे त्यांना जामठा येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मदार शेख यांच्या मृत्यूची वार्ता कळताच पोलीस दलात शोककळा निर्माण झाली.
एक उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून मदार शेख यांची शहरातील क्रीडा क्षेत्रात ओळख होती. ते न्यू ताज क्रीडा मंडळाचे खेळाडू अन् मार्गदर्शक म्हणूूनही ओळखले जायचे. हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सलग बंदोबस्त, सारखा ताण !
गेल्या सहा महिन्यांपासून शहर पोलीस सलग बंदोबस्तावर आहे. आधी सणोत्सव, नंतर निवडणुका, त्यानंतर निकाल अन् आता अयोध्या निकाल, तो आटोपत नाही तर क्रिकेट सामन्याचा बंदोबस्त. सारख्यासारख्या बंदोबस्तामुळे पोलिसांवरील ताण कमालीचा वाढला आहे. कर्तव्यामुळे आधीच आरोग्याकडे दुर्लक्ष होत असताना हक्काच्या सुट्यांवरही गदा आल्याने पोलीस नाकतोंड दाबून बुक्क्याचा मार खावा, अशा अवस्थेत कर्तव्य बजावत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Death of soldier on duty during an India-Bangladesh cricket match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.