Dattopant Thengdi Birth Centennial Festival from 10th November | दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी महोत्सव १० नोव्हेंबरपासून
दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी महोत्सव १० नोव्हेंबरपासून

ठळक मुद्देमोहन भागवत, सुमित्रा महाजन करणार उद्घाटन : चित्रप्रदर्शन व माहितीपटाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, भारतीय मजदूर संघ, किसान संघ व स्वदेशी जागरण मंचचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाला येत्या १० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्टन होणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री विरजेश उपाध्याय यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समारोह समितीतर्फे घेण्यात येणार हा महोत्सव वर्षभर चालणार आहे. रविवारी डॉ. हेडगेवार स्मारक भवन, रेशीमबाग येथे दुपारी ३ वाजता महोत्सवाचे रीतसर उद्घाटन होणार असल्याचे उपाध्याय यांनी सांगितले. तत्पूर्वी दत्तोपंत ठेंगडी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे चित्र प्रदर्शन आणि साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. शिवाय त्यांच्यावर तयार केलेल्या माहितीपटाचेही लोकार्पण केले जाणार आहे. समारोह समितीचे सदस्य, संघाचे पदाधिकारी, आयोजक संघटनांचे केंद्रीय पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमधून शेतकरी, शेतमजूर, कामगार व विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भामस, भारतीय किसान संघ व स्वदेशी जागरण मंचच्या संयुक्त विद्यमाने यानंतर वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून नवी दिल्ली येथे महोत्सवाचा समारोप होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत किसान संघाचे संघटन मंत्री दिनेश कुळकर्णी, स्वदेशी जागरण मंचचे प्रकाश सोवनी, सुधाकर कुळकर्णी आदी उपस्थित होते.

अर्थव्यवस्थेची रचनाच चुकीची
देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली अवकळा सरकारमुळे नाही तर रचनेमुळेच आली असल्याची टीका विरजेश उपाध्याय यांनी केली. अर्थव्यवस्थेचे संकट अचानक किंवा कोणत्या सरकारमुळे आलेले नाही. स्वातंत्र्यानंतर स्वीकारण्यात आलेले अर्थव्यवस्थेचे धोरणच चुकीचे होते. ही व्यवस्था कार्पोरेट क्षेत्राला केंद्रीत ठेवून कार्य करणारी आहे. ती देशहिताची नाही. त्यामुळे चढ उतार होउन आजची परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगात अर्थव्यवस्था कामगार व सामान्य माणूस केंद्रीत असावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतलेला बँकांच्या राष्ट्रियीकरणाचा निर्णयही चुकीचा असल्याचे उपाध्याय म्हणाले. ते बँकांचे राष्ट्रियीकरण नाही तर सरकारीकरण होते, अशी टीका त्यांनी केली.

Web Title: Dattopant Thengdi Birth Centennial Festival from 10th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.