महेशनगरच्या कश्यप कॉलनीत धाडसी घरफोडी; ७३ लाखांचा मुद्देमाल चोरीला
By दयानंद पाईकराव | Updated: October 31, 2022 14:33 IST2022-10-31T14:32:20+5:302022-10-31T14:33:30+5:30
साखरपुड्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या घरातून दीड किलो सोन्याचे दागिने लंपास

महेशनगरच्या कश्यप कॉलनीत धाडसी घरफोडी; ७३ लाखांचा मुद्देमाल चोरीला
नागपूर : साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या व्यक्तीच्या घरातून रविवारी सायंकाळी ७.३० ते रात्री १०.४० दरम्यान अज्ञात आरोपीने रोख रक्कम व सोन्याचे दागीने असा एकूण ७३ लाखांचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरात घरफोड्यांचे गुन्हे वाढले असून दररोज शहरातील विविध भागात बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घरी घरफोडी करून आरोपी रोख रक्कम, दागीने पळविण्याच्या घटना घडत आहेत. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जावेद अब्दुल रज्जाक थारा (५६, प्लॉट नं. एच-३, महेशनगर, कश्यप कॉलनी) हे रविवारी आपल्या घराला कुलूप लाऊन कुटुंबासह कामठी येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. दरम्यान अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
आरोपीने बेडरुममधील लाकडी कपाटात ठेवलेले इलेक्ट्रॉनिक लॉकर उघडून त्यातील ५०० रुपयांचे २६ बंडल असे १३ लाख रुपये आणि सोन्याचे दीड किलो वजनाचे दागीने किंमत ६० लाख रुपये असा एकुण ७३ लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. जावेद यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.