लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतापनगरातील रवींद्रनगरात(परसोडी)राहणाऱ्या एका कंत्राटदाराच्या घरातून चोरट्याने साडेचार लाखांची रोकड आणि सोन्याची अंगठी चोरून नेली. रविवारी सकाळी ही धाडसी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ निर्माण झाली.मनीष विजय शहा (वय ५०) हे परसोडीत राहतात. ते बांधकाम कंत्राटदार आहेत. ते ९ नोव्हेंबरला सायंकाळी सहपरिवार कोल्हापूरला गेले होते. रविवारी सकाळी ते परत आले. तेव्हा त्यांना दाराचा कुलूपकोंडा तुटून दिसला. चोरट्याने आधी ग्रीलच्या गेटचे आणि नंतर दाराचे सेंट्रल लॉक तोडून शहा यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर शयनकक्षातील लाकडी कपाटात ठेवलेली ४ लाख ५४ हजार ६०० रुपयांची रोकड आणि सोन्याची अंगठी चोरून नेली. रविवारी सकाळी शहा परिवार घरी परतल्यानंतर ही चोरी उजेडात आली. त्यांनी प्रतापनगर पोलिसांना कळविले. पोलिसांनी आजूबाजूला विचारणा केली, मात्र चोरट्याबद्दल कुणीही काही सांगू शकले नाही.विशेष म्हणजे, शहा यांनी काही दिवसांपूर्वी कर्मचारी आणि मजुरांचा पगार देण्यासाठी १२ लाखांची रोकड घरी आणून ठेवली होती. एका प्लास्टिकच्या पिशवीत ही रोकड आणि सोन्याची अंगठी ठेवून त्यांनी ही पिशवी कपाटात ठेवली. चोरट्याने १२ लाखांपैकी ४ लाख ५४ हजार ६०० रुपये आणि सोन्याची अंगठी चोरून नेली. उर्वरित रक्कम पिशवीत तशीच ठेवली. दुसरे म्हणजे, चोरट्याने रक्कम नेताना नोटांच्या बंडलातील खालच्या आणि वरच्या नोटा तशाच ठेवून मधातील नोटा काढून नेल्या. त्यामुळे ही चोरी संशयास्पद ठरली आहे. ती संपर्कातील व्यक्तीनेच केली किंवा करवून घेतली असावी, असा संशय आहे. शहा यांनीही दोन संशयितांकडे अंगुलीनिर्देश केल्याची माहिती आहे. प्रतापनगरचे हवालदार शेषराव अंतुलकर यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
नागपूरच्या प्रतापनगरात धाडसी घरफोडी : साडेचार लाखांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 20:40 IST
प्रतापनगरातील रवींद्रनगरात(परसोडी)राहणाऱ्या एका कंत्राटदाराच्या घरातून चोरट्याने साडेचार लाखांची रोकड आणि सोन्याची अंगठी चोरून नेली. रविवारी सकाळी ही धाडसी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ निर्माण झाली.
नागपूरच्या प्रतापनगरात धाडसी घरफोडी : साडेचार लाखांची रोकड लंपास
ठळक मुद्दे सोन्याची अंगठीही पळविली