नागपूर जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीला व्हायब्रेशनचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:01 IST2018-03-16T22:01:46+5:302018-03-16T22:01:58+5:30
समाजकल्याण सभापतीच्या कक्षातील टाईल्स या निकृष्ट बांधकामामुळे नाही, तर व्हायब्रेशनमुळे पडल्याचा अहवाल बांधकाम विभागाने दिला आहे. बांधकाम विभागाच्या या अहवालामुळे जि.प.च्या नवीन इमारतीला व्हायब्रेशनचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीला व्हायब्रेशनचा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजकल्याण सभापतीच्या कक्षातील टाईल्स या निकृष्ट बांधकामामुळे नाही, तर व्हायब्रेशनमुळे पडल्याचा अहवाल बांधकाम विभागाने दिला आहे. बांधकाम विभागाच्या या अहवालामुळे जि.प.च्या नवीन इमारतीला व्हायब्रेशनचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सभापती दीपक गेडाम यांच्या कक्षातील शौचालयातील टाईल्स अचानक कोसळल्या. त्यावेळी कक्षात असलेले सदस्य नाना कंभाले थोडक्यात बचावले. या संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी केदार यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले. या कक्षात खिडकी व एक फॅन आहे. खिडकी व फॅनमुळे होणाऱ्या व्हायब्रेशनमुळे टाईल्स पडल्याचा अहवाल दिला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी केदार यांनी याची माहिती दिली. हे काम पात्रता कालावधीत असल्यामुळे त्याच्याकडून पुन्हा करवून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिसऱ्यांदा या टाईल्स पडल्या असतानाही कंत्राटदाराची कोणतीही जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही. कंत्राटदाराला वाचविण्यासाठी टाईल्स पडल्याचे खापर खिडकीच्या व्हायब्रेशनच्या माथी फोडण्यात येत असल्याची चर्चा आहे.