दक्षिण एक्सप्रेसच्या प्रवाशाला मिळाला व्हेज बिर्याणीत काक्रोच; संतप्त प्रवाशाकडून तक्रार

By नरेश डोंगरे | Updated: July 13, 2025 00:11 IST2025-07-13T00:11:20+5:302025-07-13T00:11:20+5:30

रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

Dakshin Express passenger found cockroach in veg biryani | दक्षिण एक्सप्रेसच्या प्रवाशाला मिळाला व्हेज बिर्याणीत काक्रोच; संतप्त प्रवाशाकडून तक्रार

दक्षिण एक्सप्रेसच्या प्रवाशाला मिळाला व्हेज बिर्याणीत काक्रोच; संतप्त प्रवाशाकडून तक्रार

नरेश डोंगरे

नागपूर : प्रवाशांना चांगल्यात चांगले जेवण देण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. मात्र, रेल्वे गाड्यांमध्ये किचन (पेंट्री कार) चालविणारे काही महाभाग गलिच्छपणा अंगिकारून या प्रयत्नांना सुरूंग लावत आहे. अशीच एक घटना शुक्रवारी दक्षिण एक्सप्रेसमध्ये उघडकीस आली. प्रवाशाने ऑर्डर केलेल्या वेज बिर्याणीत चक्क काक्रोच आढळल्याने प्रवाशीच नव्हे तर रेल्वे प्रशासनातही संतापाचे वातावरण निर्माण झाले.

दीपांशू सोनवणे (मध्य प्रदेश) हे गुरुवारी १० जुलैला ट्रेन नंबर १२७२१ दक्षिण एक्सप्रेसच्या बी-२ कोच (बर्थ नंबर ७) मध्ये बसून सिकंदराबादहून भोपाळला जात होते. शुक्रवारी ११ जुलैला सकाळी १० च्या सुमारास ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर आली. प्लॅटफॉर्म नंबर एकवर गाडी उभी असताना दीपांशूला जाग आली. त्यांनी ट्रेनमधील वेंडरकडून ७० रुपयांत एक व्हेज बिर्याणी विकत घेतली. ते पाकिट तसेच ठेवून दीपांशू पुन्हा झोपले. काही वेळेनंतर उठून त्यांनी बिर्याणी खाण्यासाठी पाकिट उघडले. बिर्याणी राईसला खाली वर केले असता त्यांना त्यात एक मेलेला काक्रोच आढळला. त्यांनी आजुबाजुच्या प्रवाशांना दाखवून बिर्याणीसह काक्रोचचा फोटो काढून तो रेल्वे मदत अॅपवर अपलोड केला.

कॉक्रोच व्हायरल

दीपांशू यांच्या तक्रारीची रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. चेकिंग स्टाफने पेंट्रीकारची लगेच तपासणी केली आणि दीपांशूच्या तक्रारीसह कारवाईची शिफारस आयआरसीटीसीकडे केली. दरम्यान, या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हेज बिर्याणीत आढळलेल्या मेलेल्या कॉक्रोचचा फोटो सर्वत्र झपाट्याने व्हायरल होत आहे.

कडक कारवाई करणार : सिनियर डीसीएम

या संबंधाने मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांच्याकडे लोकमतने संपर्क केला असता त्यांनी या गंभीर प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आल्याचे सांगितले. पॅट्री कारच्या स्टाफ आणि व्यवस्थापकावर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर दंडाच्या कारवाईचीही शिफारस करण्यात आली असून, किमान ५० हजार रुपयांचा दंड त्याला भरावा लागेल, असेही मित्तल यांनी सांगितले.

Web Title: Dakshin Express passenger found cockroach in veg biryani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.