खुलेआम मिळतेय ‘मौत का सामान’! सिरियल किलर्सकडून होतो वापर, कोण घालणार निर्बंध?
By नरेश डोंगरे | Updated: March 10, 2025 01:15 IST2025-03-10T01:13:04+5:302025-03-10T01:15:30+5:30
खतरनाक गुन्हेगारांकडून, सिरियल किलर्सकडून हत्येसाठी सायनाइड वापररत असल्याचेही वारंवार उघड झाले आहे. त्यामुळे हे अत्यंत घातक विष सहजपणे उपलब्ध होत नसावे, असा समज होता.

खुलेआम मिळतेय ‘मौत का सामान’! सिरियल किलर्सकडून होतो वापर, कोण घालणार निर्बंध?
-नरेश डोंगरे, नागपूर
तोंडात जाताच थेट मृत्यूच्या जबड्यात ढकलणारे अत्यंत जहाल असे ‘सायनाइड’ विविध ट्रेडिंग कंपन्यांकडून खुलेआम विकण्यात येत आहे. ‘माैत का सामान’ विकणाऱ्या या कंपन्यांचा हा अत्यंत घातक व्यवहार बिनबोभाट सुरू असल्याने त्यावर निर्बंध कोण घालणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सायनाइड सर्वांत जहाल विष मानले जाते. त्याचा छोटासा कणसुद्धा मृत्यूला कारणीभूत ठरतो. शत्रूंना संपविण्यासाठी पूर्वी सायनाइडचा वापर केला जायचा. हेरगिरी करणारे किंवा शत्रूराष्ट्रात घातपात घडविण्यासाठी शिरलेले दहशतवादी, पकडले जाताच सायनाइडचा खाऊन स्वत:ला संपवितात.
खतरनाक गुन्हेगारांकडून, सिरियल किलर्सकडून हत्येसाठी सायनाइड वापररत असल्याचेही वारंवार उघड झाले आहे. त्यामुळे हे अत्यंत घातक विष सहजपणे उपलब्ध होत नसावे, असा समज होता. मात्र, तो खोटा ठरला आहे. कारण अनेक कंपन्यांकडून बिनधास्त सायनाइड विकले जात असल्याचे विविध वेबसाइटवर बघायला मिळते.
‘गुगल बाबां’ना टच करताच ती माहिती मिळते. कुण्या कंपनीकडून प्रति ग्रॅम १ हजार, कुणी १२०० तर कुणी ६६० रुपयांत सायनाईड विकत आहे. सिग्मा-अल्ड्रीच पोटॅशियम सायनाइड प्रति ग्रॅम १३,२१७ रुपये प्रति ग्रॅम दरानेही विकत आहे. वेगवेगळे वितरक अन् वेगवेगळे दर, असा हा ऑनलाइन बाजार आहे.
'मांडवलीचा बादशाह'
नागपुरातील गुन्हेगारी जगतात ‘मांडवली’चा बादशाह मानला जाणारा बुकी सुभाष शाहू याची त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी प्रसादातून पोटॅशिअम सायनाइड देऊन हत्या केली होती. नागपुरातील सायनाईड किलिंगचे हे पहिले प्रकरण त्यावेळी प्रचंड गाजले होते.
छत्तीसगड-मध्य प्रदेश
नोव्हेंबर २०२४ मध्ये छत्तीसगड-मध्य प्रदेशात नोटांचा पाऊस पाडण्याची थाप मारून एका तांत्रिकाने तीन आठवड्यांत तिघांना सायनाइड देऊन ठार मारले होते.
‘कर्नाटकची सायनाइड मल्लिका’
१९९९ ते २००७ च्या दरम्यान सायनाइड खाऊ घालून कर्नाटकात ११ महिलांची हत्या करण्यात आली होती. २००८ ला कर्नाटक पोलिसांनी के. डी. केम्पामा हिला ताब्यात घेतल्यानंतर ‘सायनाइड किलिंग’ प्रकरणाचे गूढ उलगडले.
देवदर्शनाला दागदागिने घालून आलेल्या महिलांना केम्पामा मंदिराच्या बाजूला न्यायची. सायनाइड मिसळलेला पदार्थ तिच्या तोंडात कोंबायची. मृत्यू होताच त्या महिलेच्या अंगावरचे दागिने घेऊन पळून जायची, असे त्यावेळी उघड झाले होते.