गणेशपेठमध्ये ‘कस्टडी डेथ’
By Admin | Updated: December 14, 2014 00:46 IST2014-12-14T00:46:25+5:302014-12-14T00:46:25+5:30
गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यातील एका आरोपीचा मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. ‘कस्टडी डेथ’चे हे प्रकरण दडपण्यासाठी गणेशपेठ पोलिसांनी जोरदार प्रयत्न केले.

गणेशपेठमध्ये ‘कस्टडी डेथ’
मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू : पोलीस दलात खळबळ
नागपूर : गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यातील एका आरोपीचा मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. ‘कस्टडी डेथ’चे हे प्रकरण दडपण्यासाठी गणेशपेठ पोलिसांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, वरिष्ठांना कुणकुण लागल्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
सचिन अनिल वाघधरे (वय ३४) असे मृताचे नाव आहे. तो मॉडेल मिल चाळीत राहात होता. ८ डिसेंबरला दारू विक्रीच्या आरोपात त्याला गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘साहेबांना हप्ता न देता धंदा करतो’, असे म्हणत त्याला प्रारंभी एका कर्मचाऱ्याने आणि नंतर ठाणेदाराने मारहाण केल्याचे समजते. जबर मारहाणीमुळे सचिनची प्रकृती ढासळली.
ठाण्यातील सूत्रांच्या माहितीनुसार, सचिनने प्रकृती चांगली वाटत नसल्याची तक्रार केली होती. मात्र, ‘साहेबांनी’ त्याला नाटक करतो, असे म्हणत शिवीगाळ केल्याचे समजते. दरम्यान, योग्य वेळी वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे सचिनची प्रकृती ढासळतच गेली. तो अत्यवस्थ झाल्यानंतर पोलिसांनी त्याला मेयोत दाखल केले.
डॉक्टरांनी त्याच्यावर शर्थीचे औषधोपचार केले. मात्र, शुक्रवारी सचिनचा मृत्यू झाला. कस्टडीतील आरोपीचा मृत्यू झाल्यामुळे गणेशपेठ ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यांनी या प्रकरणाचा बोभाटा होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले. शुक्रवारी रात्री या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याबाबत तक्रार करू नये म्हणून कारवाईचा धाक दाखवून मृताच्या नातेवाईकांवरही दडपण आणण्यात आल्याचा आरोप आहे. रात्री आणि आज सकाळीसुद्धा गणेशपेठ पोलिसांनी माहिती कक्षाला याबाबतची माहिती देण्याचे टाळले.
प्रकरण सीआयडीकडे
प्रकरण वरिष्ठांच्या कानावर गेल्यामुळे डीसीपी निर्मला देवी, एसीपी भगत यांनी रात्रीच गणेशपेठ पोलिसांकडून वास्तव जाणून घेतले. प्रकरण ‘कस्टडी डेथ’चे असूनही रात्रीपर्यंत सीआयडी अधिकाऱ्यांना कळविण्यात आले नाही. बोभाटा झाल्याचे लक्षात आल्यामुळे आज सीआयडीचे इन्स्पेक्टर माधव गिरी यांना माहिती आणि नंतर प्रकरणाची कागदपत्रे सोपविण्यात आली.
डीसीपी निर्मलादेवी
सचिनला मिरगी(फिट)चा आजार होता. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. त्याला मारहाण झाली की नाही, कुणी मारहाण केली, ते उघड झाले नाही. तो कोमात असल्यामुळे त्याच्याकडून कोणतीही माहिती घेता आली नाही. मात्र, प्रकरण गंभीर आहे. त्याची सीआयडीकडून चौकशी केली जाणार आहे. जो कुणी दोषी असेल, ते स्पष्ट होईल.