Curfew in Nagpur brought pollution under control | नागपुरातील  संचारबंदीने प्रदूषणाला आणले नियंत्रणात

नागपुरातील  संचारबंदीने प्रदूषणाला आणले नियंत्रणात

ठळक मुद्देकॉर्बन डाय ऑक्साईड, धुलिकणात मोठी घट : कोट्यवधींच्या उपाययोजनांचे काम सोपे

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : बंद झालेले कारखाने, रस्त्यावर धावणाऱ्या एकदोन गाड्या आणि माणसांचेही फिरणे थांबले आहे. हे खरेतर चिंताजनक वातावरण आहे. मात्र यातून काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत. तुम्ही घरात आहात यामुळे केवळ कोरोना विषाणूची साखळी तुटतेय असे नाही तर या संचारबंदीचा फायदा निसर्गालाही होत आहे. आपल्या नागपूर शहराचे प्रदूषण कमालीचे घटत आहे. होय, शहराचे प्रदूषण निम्म्याने कमी झाले आहे.
कोरोना विषाणूच्या उद्रेकाने संपूर्ण जगाला भीतीच्या खाईत लोटले आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाने भारतालाही विळख्यात घेतले असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने संचारबंदी व लॉकडाऊन लागू केले आहे. या संचारबंदीने लोकांना घरात बंदिस्त राहावे लागत आहे. घरी राहावे लागत असल्याने कंटाळवणे झाल्याचा विचार करीत असले तरी यातून काही सकारात्मक गोष्टीही घडून आल्या आहेत. रस्त्यावर वाहनांची संख्या कमालीची घटली आहे. अत्यावश्यक सेवा, शासकीय कर्मचाऱ्यांची वाहने सोडली तर रस्त्यावर वाहने नाहीत. मानवी संचारही कमी झाला आहे. दुसरीकडे लहानमोठे कारखाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद झाली आहेत आणि बांधकामेही बंद झाली आहेत. या सर्वांमुळे सर्व प्रकारच्या प्रदूषणात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा लॉकडाऊन १५ एप्रिलपर्यंत चालणार असल्याने कॉर्बन फूटप्रिंट कमी करण्यात मोठी मदत होईल आणि काही वर्षांचा फरक पडेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नागपूर शहरात धुलिकण आणि वाहनांमुळे होणारे कॉर्बनचे उत्सर्जन ही सर्वात मोठी समस्या आहे. मानवी संचार, मोठ्या प्रमाणात होणारे बांधकाम आणि काही प्रमाणात नैसर्गिक गोष्टींमुळे धुलिकणांची समस्या फार मोठी आहे. शहरात धुलिकणांचा स्तर १५० ते १६० पर्यंत पोहचलेला असतो. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये कमी झालेले मानवी संचार आणि थांबलेली बांधकामे यांच्यामुळे वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण ५० ते ६० पर्यंत खाली आले आहे. हीच बाब वाहनांच्या प्रदूषणाबाबतही दिसून येत आहे. १६ मार्चच्या लॉकडाऊनमध्ये शहरांतर्गत रस्ते आणि महामार्गही सुनसान होते. त्यानंतरही संचारबंदी लागू करण्यात आली आणि वाहनांची संख्या घटली. त्यामुळे कार्बन आॅक्साईडचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ याबाबत सातत्याने अवलोकन करीत आहे. त्यांच्या मते कार्बन, नायट्रस वायू आणि पार्टिकुलेट मॅटरचे (धुलिकण) प्रमाण निश्चितच घटले आहे. मात्र सध्या निरीक्षण सुरू असून याबाबत निश्चित आकडेवारी काही दिवसानंतरच देता येईल, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नागपूर विभाग प्रमुख डॉ. हेमा देशपांडे यांनी सांगितले.
 रस्त्यावर वाहनांची संख्या कमालीची घटली आहे, कारखाने व कंपन्यांची कामे ठप्प झाली आहेत आणि मानवी संचारही कमी झाला आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या प्रदूषणात निश्चितच घट झाली आहे. जे काही प्रमाण आहे ते नैसर्गिक गोष्टींमुळे आहे. एमपीसीबी व सीपीसीबी या परिस्थितीवर मॉनिटरिंग करीत आहे. लॉकडाऊननंतरच याबाबत अधिक माहिती देता येईल.
 डॉ. हेमा देशपांडे, विभाग प्रमुख, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

लॉकडाऊनमुळे प्रदूषण कमी करण्याचा मोठा लाभ लोकांना झाला आहे. धुलिकण कमालीचे घटले आहे आणि कार्बन प्रदूषणाचा स्तरही कमी झाला आहे. सर्व गोष्टी सुरू राहिल्यानंतर जे गोष्ट करण्यास अनेक वर्ष लागले असते ते काही दिवसांच्या लॉकडाऊनमुळे शक्य झाले आहे. कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना करूनही हे यश मिळणे शक्य झाले नसते.
कौस्तुभ चटर्जी, पर्यावरण तज्ज्ञ.

 

Web Title: Curfew in Nagpur brought pollution under control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.