नागपुरात संचारबंदीचे भोंगे, पोलिसांची वाहने अन् पोलिसच पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 23:16 IST2020-03-24T23:07:59+5:302020-03-24T23:16:13+5:30
गल्लीबोळात संचारबंदीची सूचना देत फिरणाऱ्या पोलिसांच्या गाड्या आणि चौकाचौकात दिसणारे पोलीस. निर्मनुष्य रस्ते अन् वस्त्यांमध्ये सामसूम. त्यातल्यात्यात किराणा आणि भाजीच्या दुकानात दिसणारी थोडी फार मंडळी अन् कारण नसताना रस्त्यावर आलेल्यांची पोलिसांकडून होत असलेली चौकशी, असे आज मंगळवारचे उपराजधानीचे चित्र होते.

नागपुरात संचारबंदीचे भोंगे, पोलिसांची वाहने अन् पोलिसच पोलीस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी सकाळपासून उपद्रवी मंडळींकडून संचारबंदीचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे पाहून पोलिसांनी कडक धोरण अवलंबिल्यामुळे आज मंगळवारी त्याचे चांगले परिणाम नागपुरात दिसून आले. रस्ते, गल्लीबोळात संचारबंदीची सूचना देत फिरणाऱ्या पोलिसांच्या गाड्या आणि चौकाचौकात दिसणारे पोलीस.
निर्मनुष्य रस्ते अन् वस्त्यांमध्ये सामसूम. त्यातल्यात्यात किराणा आणि भाजीच्या दुकानात दिसणारी थोडी फार मंडळी अन् कारण नसताना रस्त्यावर आलेल्यांची पोलिसांकडून होत असलेली चौकशी, असे आज मंगळवारचे उपराजधानीचे चित्र होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रविवारचा जनता कर्फ्यू संपल्यानंतर पोलिसांनी नागपुरात संचारबंदी घोषित केली. अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले. मात्र, त्याला दाद न देता काही उत्साही तर काही रिकामटेकडी मंडळी बगीच्यात फिरावी तशी शहरात फिरू लागली. काही टवाळखोर मंडळी तर टिकटॉक व्हिडिओ बनवू लागली. ते सोशल मीडियावर व्हायरल करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रंदिवस जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या मंडळींच्या प्रयत्नांना ही मंडळी खीळ घालू पाहत असल्याचे लक्षात आल्याने सर्वत्र संतापजनक प्रतिक्रिया उमटली. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी सोमवार दुपारनंतर कडक धोरण अवलंबिले. रात्रीपासून पोलिसांची गस्ती वाहने शहरभर संचारबंदीची माहिती आणि त्याचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देत फिरू लागली. त्याचे अतिशय चांगले परिणाम मंगळवार सकाळपासून शहरात दिसले. शासन आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ९० ते ९५ टक्के नागरिकांनी आपापल्या घरातच बसणे पसंत केले. सकाळी ५.३० वाजतापासून दूध, ब्रेड, भाजीपाला आणि नंतर किराणा, दळण तसेच औषध घेण्याच्या निमित्ताने नागरिक घराबाहेर पडले. दुपारनंतर रस्त्यावरची चहलपहल थांबली.
इकडे सकाळी ९ वाजतापासून पोलीस रस्त्यारस्त्यावर दिसू लागले. पोलिसांच्या गस्ती वाहनांचे भोंगे नागरिकांना सूचना देताना फिरत होती. अशातही काही उपद्रवी मंडळी घराबाहेर फिरण्यासाठी बाहेर पडली. त्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना दंडुक्याचा प्रसाद दिला. काहींना पिटाळून लावले तर काही जणांकडून पोलिसांनी उठाबशा काढून घेतल्या.
कारवाईचे स्वरूप!
शनिवार १४ मार्च ते मंगळवार २४ मार्च दुपारी ४ वाजेपर्यंत शहर पोलिसांनी नागपुरात एकूण ४२६ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर, कलम १८८ च्या मनाईआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४१८ गुन्हे दाखल करून ३,७७५ लोकांना ताब्यात घेण्यात आले. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी १६६२ चालान कारवाई केली.
मंगळवारी सकाळपासून पोलिसांनी संचारबंदीच्या संबंधाने कडक धोरण अवलंबिले. मंगळवार २४ मार्च दुपारी ४ वाजेपर्यंत शहर पोलिसांनी नागपुरात एकूण ६ गुन्हे दाखल केले. ३६६ जणांना ताब्यात घेतले तर, नाकाबंदी दरम्यान ३८७ वाहनचालकांवर चालान कारवाई करण्यात आली. या आकडेवारीसह शनिवार १४ मार्च ते मंगळवार २४ मार्च दुपारी ४ वाजेपर्यंत नागपुरात एकूण ४२६ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. कलम १८८ च्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४१८ गुन्हे दाखल करून ३७७५ लोकांना ताब्यात घेण्यात आले. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केलेल्या चालान कारवाईचा आकडा १६६२ वर पोहचला.
अडचण असेल तर पोलिसांना फोन करा
शहरात संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक काम असले आणि काही अडचण, समस्या किंवा कोणता प्रश्न निर्माण झाला असेल किंवा कोणती माहिती सूचना द्यायची असेल तर नागरिकांनी नागपूर शहर पोलीस नियंत्रण कक्षाच्या व्हॉटस्अॅप नंबर ९०११३८७१०० या क्रमांकावर शेअर करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
बुधवारी अधिक कडक होणार संचारबंदी
सोमवारच्या तुलनेत मंगळवारी नागपुरातील संचारबंदी कडक राहिली. बुधवारी ती अधिक कडक होणार आहे. मात्र, जीवनावश्यक चिजवस्तू, औषधे, दूध, भाजीपाला आणि फळांची दुकाने मात्र सुरू राहणार आहे. त्यामुळे कुणाचीही गैरसोय अथवा कुचंबणा होणार नाही. त्यामुळे बुधवारी सकाळपासून विनाकारण कुणी घराबाहेर पडल्यास पोलिसांचे दंडुके आणि कायदेशीर कारवाई अशा दुहेरी कारवाईचा सामना संबंधित व्यक्तीला करावा लागू शकतो, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.