नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
By योगेश पांडे | Updated: December 16, 2025 21:45 IST2025-12-16T21:43:39+5:302025-12-16T21:45:38+5:30
आता मुलाखती १८ ऐवजी २० डिसेंबरपर्यंत चालणार आहेत

नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीत उमेदवारासीठी मंगळवारपासून भाजपच्या कार्यालयात मुलाखतींचे सत्र सुरू झाले. मात्र पक्षात तिकीटासाठी प्रचंड चढाओढ असल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले. मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी झाल्याने अखेर भाजपला मुलाखतींच्या वेळापत्रकातच बदल करावा लागला आहे. आता मुलाखती १८ ऐवजी २० डिसेंबरपर्यंत चालणार आहेत.
भाजपकडून मागील आठवड्यात निवडणूकीच्या उमेदवारीसाठी अर्ज विक्री करण्यात आली. तीन हजारांहून अधिक अर्जांची विक्री झाली होती. त्याअगोदर भाजपने प्रभागनिहाय इच्छुकांच्या प्राथमिक मुलाखतीदेखील घेतल्या होत्या. निवडणूक घोषित झाल्यावर लगेच पक्षाकडून १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत पक्षाच्या गणेशपेठ कार्यालयात मुलाखती होतील असे जाहीर करण्यात आले. १६ डिसेंबर रोजी पूर्व व पश्चिम नागपूर, १७ डिसेंबर रोजी उत्तर व दक्षिण नागपूर, १८ डिसेंबर रोजी दक्षिण-पश्चिम व मध्य नागपूर अशा मुलाखती होणार होत्या. पहिल्याच दिवशी पूर्व व पश्चिम नागपुरातील इच्छुक भाजप कार्यालयात पोहोचले. मात्र प्रचंड गर्दी झाली व अनेकांना ताटकळत रहावे लागले. हे पाहता भाजपाने आता वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी उत्तर नागपूर विधानसभेतील प्रभाग १ ते प्रभाग ९ पर्यंतच्या मुलाखती होतील. १८ डिसेंबर रोजी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभेतील प्रभाग १६, १७ तसेच प्रभाग ३५ ते प्रभाग ३८ च्या इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. १९ डिसेंबर रोजी दक्षिण नागपुरातील प्रभाग २८ ते प्रभाग ३४ मधील इच्छुकांच्या मुलाखतीचे नियोजन करण्यात आले आहे. तर २० डिसेंबर रोजी मध्य नागपूर विधानसभेतील प्रभाग ८ तसेच प्रभाग १८ ते २२ मधील इच्छुकांना मुलाखतींना बोलविले आहे. त्याच दिवशी सायंकाळी पश्चिम नागपुरातील प्रभाग १४ व प्रभाग १५ तील मुलाखती होतील.