बाजार, लग्न समारंभ, अंत्यविधीतील गर्दी धाेकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:21+5:302021-04-04T04:08:21+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : दुसऱ्या टप्प्यात काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत असताना नागरिक व प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययाेजनांबाबत फारसे गंभीर ...

Crowds at markets, weddings, funerals | बाजार, लग्न समारंभ, अंत्यविधीतील गर्दी धाेकादायक

बाजार, लग्न समारंभ, अंत्यविधीतील गर्दी धाेकादायक

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : दुसऱ्या टप्प्यात काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत असताना नागरिक व प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययाेजनांबाबत फारसे गंभीर असल्याचे दिसून येत नाही. परिणामी, कुही तालुक्यात राेज किमान ५० ते ६० रुग्णांची भर पडत असून, मृत्युदरही हळूहळू वाढत आहे. आठवडी बाजार, लग्नसमारंभ व अंत्यविधीत नागरिकांची हाेत असलेली गर्दीदेखील काेराेना संक्रमणास कारणीभूत ठरत असल्याची माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली.

कुही तालुक्यात शुक्रवार (दि. २)पर्यंत १,१४८ काेराेना संक्रमित रुग्णांची नाेंद करण्यात आली आहे. तालुक्यातील कुही शहरासह मांढळ, हरदाेली (राजा), हरदाेली (नाईक), आकाेली, वेलतूर, बाेरी (सदाचार) ही गावे काेराेना संक्रमणात आघाडीवर आहेत. त्यामुळे तालुक्यात राेज किमान ५० ते ६० काेराेनाचे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. मध्यंतरी लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर नागरिकांचे विनाकारण घराबाहेर पडणे, माेठ्या प्रमाणात लग्नसमारंभ तसेच सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन करणे, बाजार व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, मास्क न वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यासारख्या बाबी काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडत आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर यांनी नुकतीच हरदोली (राजा) व वग या गावांना भेटी दिल्या आहेत. हरदाेली (राजा) येथील नागरिकांनी वग येथील शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करण्याची मागणी केली. मात्र, वग ग्रामपंचायत प्रशासनाने त्याला नकार दिला. वास्तवात, हरदाेली (राजा) शाळा व समाजभवनाची इमारत आहे. दुसरीकडे, तालुक्याच्या ठिकाणी (कुही) काेविड केअर सेंटर व विलगीकरण कक्ष सुरू करण्याची मागणीही केली जात आहे.

...

१७ जणांचा मृत्यू

कुही तालुक्यत काेराेना संक्रमणासाेबतच काेराेनामुळे मृत्यू हाेण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येते. आठवडाभरात १७ काेराेना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, यात हरदाेली (नाईक) येथील नऊ, आकाेली येथील पाच व बाेरी (सदाचार) येथील एकाचा समावेश आहे. कुही येथे बुधवारी, मांढळ येथे मंगळवारी, वेलतूर येथे शुक्रवारी, पचखेडी येथे शनिवारी, साळवा येथे साेमवारी, तारणा येथे रविवारी आठवडी बाजार भरत असून, हे आठवडी बाजार काेराेना संक्रमण काळातही पूर्वीप्रमाणेच भरत आहेत. आकाेली, गाेठणगाव येथील नागरिक कुही येथील, हरदाेली (राजा) येथील नागरिक मांढळ व हरदाेली (नाईक) येथील नागरिक वेलतूर येथील आठवडी बाजारात जातात. विशेष म्हणजे ही गावे काेराेना संक्रमित आहेत.

...

विलगीकरणाची समस्या

गावांमधील काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांना त्यांच्या घरी विलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचना दिल्या जातात. बहुतेकांच्या घरी स्वतंत्र खाेल्या नसल्याने ते कुटुंबीयांच्या संपर्कात येतात, तर काही बाहेरही फिरायला जातात. छाेट्या गावांमध्ये एकाच दिवशी ३५ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांची हयगय आणि स्थानिक प्रशासनाच्या अनास्थेचे परिणाम या रूपाने दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विलगीकरणाची समस्या साेडविण्यासाठी संक्रमित गावांमधील समाजभवन किंवा शाळांच्या वर्गखाेल्यांचा वापर विलगीकरण कक्ष म्हणून करायला पाहिजे. यातून काेराेना रुग्णांवर नजर ठेवणे व त्यांच्यावर याेग्य उपचार करणे सुकर हाेईल.

Web Title: Crowds at markets, weddings, funerals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.