नागपुरात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:06 IST2017-12-05T23:03:53+5:302017-12-05T23:06:25+5:30
नागपूर विभागात ६३४ स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली असून ११९ बळी गेले आहेत. रुग्णालयात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसच नाही. परिणामी, गर्भवती महिला अडचणीत आल्या आहेत.

नागपुरात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा
आॅनलाईन लोकमत
नागपूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून आले आहेत. नागपूर विभागात ६३४ रुग्णांची नोंद झाली असून ११९ बळी गेले आहेत.
असे असताना, प्रशासन मात्र या रोगाला घेऊन गंभीर नसल्याचे चित्र आहे. विशेषत: मेयो, मेडिकल स्वाईन फ्लूवरील औषधांसाठी आरोग्य विभागावर अवलंबून आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या दोन्ही रुग्णालयात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसच नाही. परिणामी, गर्भवती महिला अडचणीत आल्या आहेत. लसीकरण थांबल्याने कुण्या गर्भवतीचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उपराजधानीला स्वाईन फ्लूचा वाढता विळखा धोकादायक ठरत आहे. स्वाईन फ्लूने दगावलेल्या रुग्णांमध्ये गर्भवतींची संख्या १५ आहे. यामुळे गर्भवती मातांचे लसीकरण करण्यासंदर्भात सूचना असताना लसीकरणासाठी पुढाकार घेतला जात नसल्याचे वास्तव आहे. आतापर्यंत मेडिकल, मेयो, डागासह नागपूर महापालिकेच्या रुग्णालयांना लस आणि औषधे पोहचविण्यासाठी आरोग्य विभाग पुढाकार घेत होता, परंतु अलीकडे आरोग्य विभागानेही हात वर केले. संबधित रुग्णालयांनी स्वत:च्या आर्थिक अंदाजपत्रकातून खरेदीचे धोरण तयार करावे अशी चर्चा आरोग्य विभागात आहे.
नागपूर शहरातील स्वाईन फ्लू बाधितांची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. गेल्या दहा महिन्यांत नागपूर शहरात ३०० स्वाईन फ्लू बाधित आढळले असून यातील ४६ जणांचा मृत्यू झाला. तरीदेखील महापालिकेला स्वाईन फ्लू प्रतिबंधित लस खरेदीचे शहाणपण सुचले नाही. दरम्यान मंगळवार ५ डिसेंबर रोजी ‘आम आदमी पक्षा’तर्फे जम्मू आनंद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना स्वाईन फ्लू लस उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी भेट घेतली. शिष्टमंडळात मनोज सोनी, रविकांत वाघ, अनिल शर्मा, आरिफ दोसनी, किरण ठाकरे, करण शाह, धीरज अढावू, आतिश तायवाडे, अरविंद वाघमारे, उमाकांत बनसोड यांचा समावेश होता.
स्वाईन फ्लूबाधितांसाठी स्वतंत्र आयसीयू असावे
‘आप’पक्षाच्या मागणीमध्ये स्वाईन फ्लू बाधितांसाठी स्वतंत्र आयसीयू असावे या मुख्य मागणीसह लसीकरणाची सोय , स्वाईन फ्लू तपासणी प्रयोगशाळा व औषधांचा तुटवडा दूर करण्याचीही मागणी निवेदनातून केली.