नागपुरात गुन्हेगारांची नव्या पोलीस आयुक्तांना सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 10:50 PM2020-09-04T22:50:11+5:302020-09-04T22:50:36+5:30

नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी नागपुरात येण्याच्या काही तासांपूर्वी या घटना घडल्या. गुन्हेगारांची ही नव्या पोलीस आयुक्तांना सलामी समजली जात आहे.

Criminals salute new police commissioner in Nagpur | नागपुरात गुन्हेगारांची नव्या पोलीस आयुक्तांना सलामी

नागपुरात गुन्हेगारांची नव्या पोलीस आयुक्तांना सलामी

Next
ठळक मुद्देएकाची हत्या, दोघांवर प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. तर लकडगंज आणि अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोघांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या. नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी नागपुरात येण्याच्या काही तासांपूर्वी या घटना घडल्या. गुन्हेगारांची ही नव्या पोलीस आयुक्तांना सलामी समजली जात आहे.

विलास रामाजी वरठी (वय ५४) हा धंतोलीतील यशवंत स्टेडियम जवळच्या फुटपाथवर राहत होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री ७ वाजता तो फुटपाथवर बसून होता. तेथे आरोपी मुकेश आणि त्याचा भाऊ अमोल दादारावजी मांडवकर (रा. दिघोरी) आले आणि वरठीला चिडवू लागले. आमच्याकडे पाहून का थुंकला, अशी विचारणा करून आरोपींनी वरठी याच्याशी वाद घातला. एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर आरोपी मुकेश आणि अमोलने लोखंडी रॉडने वरठी यांच्यावर हल्ला चढवला. डोक्यावर जबर फटका बसल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या वरठी यांचा मृत्यू झाला. भारत विलास वरठी (१८) याने दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी आरोपी मुकेश आणि अमोल मांडवकर या दोघांना गुरुवारी रात्री अटक केली.

ट्रक ड्रायव्हरचा हल्ला
लकडगंजच्या वर्धमान नगरात एका ट्रान्सपोर्टरकडे अरुण जागोजी जुमळे (४८) आणि आरोपी गोपी दयाराम शाहू (३२) हे दोघे ट्रक ड्रायव्हर म्हणून कामाला आहेत. त्यांच्यात आपसात थट्टामस्करीही चालायची. गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास आरोपी शाहूने जुमळे यांना बेवडा म्हणून चिडवले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. तो टोकाला गेल्यानंतर आरोपीने लोखंडी पाईपने जुमळे यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. जुमळे यांचा मुलगा नवीन (१७) हा वडिलांना वाचविण्यासाठी पुढे धावला असता त्यालाही आरोपीने मारहाण केली. आजूबाजूची मंडळी धावली आणि त्यांनी आरोपीला आवरले. त्यानंतर स्वप्निल अरुण जुमळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शाहूला अटक केली.

अशाच प्रकारे मानेवाडातील बजरंगनगरात राहणारा आरोपी भूषण उमाटे याने सुमित राजेंद्र डोंगरे याला गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास अ‍ॅक्टिव्हाने कट मारला. सुमितने आरोपी भूषणला जाब विचारला असता त्याने वाद घातला आणि आपल्या पाच साथीदारांना बोलवून सुमित डोंगरेवर हल्ला चढवला. त्याला लाठ्याकाठ्याने मारून गंभीर जखमी केले. डोंगरेने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.
---

 

Web Title: Criminals salute new police commissioner in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.