नागपुरातील वसंतराव नाईक झोपडपट्टीत गुन्हेगाराची हत्या, साथीदार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 00:31 IST2025-04-10T00:31:37+5:302025-04-10T00:31:57+5:30
सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ही घटना घडली.

नागपुरातील वसंतराव नाईक झोपडपट्टीत गुन्हेगाराची हत्या, साथीदार जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नेहमी विविध कारणांसाठी चर्चेत असलेली अमरावती मार्गावरील वसंतराव नाईक झोपडपट्टी परत हादरली आहे. एका गुन्हेगाराची हत्या करण्यात आली असून त्याचा मित्र जखमी आहे. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ही घटना घडली.
सागर शंकर मसराम (२७) असे मृतकाचे नाव आहे. तर लक्ष्मण हा जखमी आहे. चंदू नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सागर आणि लक्ष्मण हे गुन्हेगार आझम उर्फ अब्बू बेगचे मित्र आहेत. मंगळवारी रात्री बेगने चंदूला धमकी दिली होती. चंदू पोलीस ठाण्यातदेखील गेला होता. बेगला बुधवारी सीताबर्डी पोलिसांनी वॉरंटवरून अटक केली. त्याच्या सांगण्यावरून सागर आणि लक्ष्मण रात्री १० वाजता चंदूच्या घरी गेले. ते चंदूला शिवीगाळ करू लागले. धोका ओळखून चंदू काठी घेऊन बाहेर आला व दोघांवरही हल्ला केला. काठीचा मार बसल्यामुळे सागरचा जागीच मृत्यू झाला. तर लक्ष्मण जखमी झाला. त्यानंतर चंदू फरार झाला. या घटनेमुळे वस्तीत खळबळ उडाली. पोलिसांनी मध्यरात्री चंदूला ताब्यात घेतले. लक्ष्मणला इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.