नागपुरात भाजपा पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 20:44 IST2018-02-17T20:39:06+5:302018-02-17T20:44:55+5:30
अवघ्या साडेतीन वर्षांत साडेचार लाखाचे व्याजापोटी १४ लाख ४४ हजार रुपये घेऊनही पुन्हा ६ लाख रुपये मागणाऱ्या आणि त्यासाठी एका दाम्पत्याचे जगणे मुश्किल करणाऱ्या दोन अवैध सावकारांवर हुडकेश्वर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.

नागपुरात भाजपा पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवघ्या साडेतीन वर्षांत साडेचार लाखाचे व्याजापोटी १४ लाख ४४ हजार रुपये घेऊनही पुन्हा ६ लाख रुपये मागणाऱ्या आणि त्यासाठी एका दाम्पत्याचे जगणे मुश्किल करणाऱ्या दोन अवैध सावकारांवर हुडकेश्वर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.
संदीप ऊर्फ सचिन पाटील आणि नितीन तराळ, अशी या आरोपींची नावे आहेत. ते भाजपाचे पदाधिकारी असल्याचे समजते. अजनीतील समर्थनगरात राहणारे हे दोघे अवैध सावकारी करतात. महिन्याला ते १० टक्के व्याज घेतात.
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाहूनगर आहे. तेथे राहणारे प्रवीणकुमार तिवारी (वय ४०) यांनी २२ आॅक्टोबर २०१४ ला पाटील आणि तराळकडून महिना १० टक्के व्याजाने ४ लाख ५० हजार रुपये उधार घेतले होते. साडेतीन वर्षांच्या कालावधीत तिवारी यांनी पाटील आणि तराळला साडेचार लाखांच्या बदल्यात १४ लाख ४४ हजार रुपये परत केले. त्याउपरही आरोपींकडून तिवारीला पैशांची नियमित मागणी सुरूच आहे. आणखी सहा लाख रुपये हवेत म्हणून या दोघांनी तिवारी दाम्पत्याला धमकावणे, छळणे सुरू केले. पैसे मिळाले नाही म्हणून आरोपींनी तिवारीच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला अन् त्यांची कार (एमएच ४०/ एसी ६७९२) जबरदस्तीने हिसकावून नेली. धमकीही दिली. त्यामुळे तिवारी दाम्पत्य दहशतीत आले. त्यांनी हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ते जास्तच दडपणात आले.
उपायुक्त भरणेंकडून दिलासा
प्रवीण आणि त्यांची पत्नी पिंकी तिवारी या दोघांनी शुक्रवारी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांची भेट घेऊन त्यांना आपली कैफियत ऐकवली. अवैध सावकारी करणारे गुंड आणि राजकीय आश्रयामुळे काहीही करू शकतात, अशी भीतीही बोलून दाखवली. उपायुक्त भरणे यांनी त्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत हुडकेश्वर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पाटील आणि तराळविरुद्ध खंडणी वसुलीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला.
प्राध्यापकाचीही आत्महत्या
पाटील आणि तराळ यांनी अशाप्रकारे अनेक गरजूंची मालमत्ता हडपून त्यांना कंगाल केल्याची चर्चा आहे. या दोघांप्रमाणेच शहरात अनेक अवैध सावकार आहेत. अशाच इमरान मसूद खान नामक अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून जुगराम बळीराम लांजेवार नामक प्राध्यापकाने दोन आठवड्यांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. हे प्रकरणही हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडले होते.