लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नीची एका व्यक्तीशी केवळ मैत्री असूनदेखील संशयाच्या भूताने पछाडलेल्या भरदिवसा पत्नी आणि पतीचा सैतान झाला. त्याने तिच्या मित्रावर कटरने वार केले व पत्नीचा गळा चिरून तर तिच्या मित्राच्या छातीवर वार करत हत्या करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी सदर व सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
भूमेश्वर पिसे (४५, हुडकेश्वर) असे आरोपीचे नाव आहे. तो ट्रक ड्रायव्हर आहे. त्याची पत्नी रेणुका सदरमधील एका खासगी बँकेत काम करते. भूमेश्वरचा स्वभाव संशयास्पद आहे. तो नेहमीच रेणुकावर संशय घेत असे. रेणुकाची हुडकेश्वर रहिवासी शैलेंद्र मानारकरशी मैत्री आहे. त्यांची केवळ मैत्री असली तरी भूमेश्वरला त्यांच्यावर संशय होता. संशयाने ग्रासलेला भूमेश्वर अनेकदा रेणुकाशी वाद घालत असे.
सोमवारी त्याने एका स्टेशनरीच्या दुकानातून कटर घेतले व दुपारी ३:१५ वाजता तो महिलेच्या बँकेत पोहोचला. त्याने रेणुका हिला तिच्याशी बोलण्यासाठी बँकेच्या पार्किंगमध्ये बोलावले. तिथे त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने अचानक हल्ला करत रेणुकाच्या मानेवर कटरने वार केले, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तो पळून गेला. रेणुकाला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
तेथून भूमेश्वर सीताबर्डी येथे शैलेंद्रच्या दुकानात पोहोचला. त्याने त्याला बोलण्यासाठी बाहेर बोलविले व झाशी राणी चौकाजवळ त्याच्या मानेवरदेखील कटरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शैलेंद्रने हाताने कटरला पकडले. मात्र आरोपीने त्याच्या गालावर व नंतर छातीवर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर तो तेथून पळून गेला. या प्रकारामुळे खळबळ उडाली. सीताबर्डी व सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, आरोपीने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
प्रेमविवाहानंतरही होता संशय
भूमेश्वरचा रेणुकासोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र संशयामुळे तो सातत्याने वाद घालायचा. या प्रकरणानंतर त्याची पत्नी व शैलेंद्रला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. आत्मसमर्पण केल्यानंतर भूमेश्वर सातत्याने पत्नीच्या प्रकृतीची चौकशी करतो आहे.