लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटणीच्या वादातून पुतण्यांनी काकालाच बेदम मारहाण करत जीव घेतला. रविवारी रात्री पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लष्करीबाग परिसरात ही घटना घडली.
सुरेंद्र राघोजी चौधरी (५५, पाटणे नगर, रायसोनी सोसायटी, इसासनी, हिंगणा) असे मृताचे नाव आहे. चौधरी हे ई-रिक्षा चालवत होते. लष्करीबाग येथील आंबेडकर कॉलनीतील प्रफुल्ल दीपक चौधरी (४२) व त्याचा भाऊ प्रशांत दीपक चौधरी ला (४२) हे जुळे भाऊ आरोपी आहेत. घराच्या हिस्सेवाटणीवरून सुरेंद्र चौधरी व त्यांच्या पुतण्यांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपींनी दारूच्या नशेत अनेकदा सुरेंद्र यांना धमकावले होते. रविवारी सुरेंद्र हे लष्करीबागमध्ये गेले होते. दारूच्या नशेत त्यांनी पुतण्यांना शिवीगाळ केली. यावरून वाद पेटला.
प्रशांतने लाकडी काठीने काकांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यात सुरेंद्र गंभीर जखमी झाले. त्यांना मेयो इस्पितळात नेण्यात आले. सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला सुरेंद्र यांचा मुलगा रोनीत (२६) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. त्यांच्या मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.