Crime News : लिव्हइनमध्ये राहणारा अल्पवयीन, गर्लफ्रेंड सोबत आला घरी; आजीने टोकताच त्याच्या आजीसह वडिलांवर हल्ला

By योगेश पांडे | Updated: September 17, 2025 16:25 IST2025-09-17T16:24:47+5:302025-09-17T16:25:33+5:30

Nagpur : संबंधित १७ वर्षीय आरोपी हा एका अल्पवयीन मुलीसोबतच भाड्याच्या खोलीत 'लिव्ह इन' मध्ये राहतो. तर त्याचे वडील आजीच्या घराजवळच भाड्याच्या घरात राहतात.

Crime News : A minor living in a live-in home came home with his girlfriend; his grandmother and father were attacked as soon as he was told off by his grandmother | Crime News : लिव्हइनमध्ये राहणारा अल्पवयीन, गर्लफ्रेंड सोबत आला घरी; आजीने टोकताच त्याच्या आजीसह वडिलांवर हल्ला

Crime News : A minor living in a live-in home came home with his girlfriend; his grandmother and father were attacked as soon as he was told off by his grandmother

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
मागील काही दिवसांपासून 'जेन-झी'मधील असंवेदनशीलतेच्या मुद्द्यावर विविध चर्चा होत आहेत. मात्र, नागपुरात याचे उदाहरणच समोर आले. एका अल्पवयीन मुलाने केवळ आजी टोकते म्हणून तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. इतकेच नव्हे तर मध्यस्थी करायला आलेल्या वडिलांनादेखील मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. यातून समाज नेमका कुठे जात आहे, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.

संबंधित १७ वर्षीय आरोपी हा एका अल्पवयीन मुलीसोबतच भाड्याच्या खोलीत 'लिव्ह इन' मध्ये राहतो. तर त्याचे वडील आजीच्या घराजवळच भाड्याच्या घरात राहतात. त्याची आजी ही समाजसेविका आहे. अल्पवयीन आरोपी हा रागीट प्रवृत्तीचा असून, लहानसहान बाबींवरून तो आजीसोबत सातत्याने भांडत असतो. १० सप्टेंबर रोजी आरोपीने कूलरचा स्टॅण्ड कुठून तरी आणला व तो वडिलांच्या खोलीत नेऊन ठेवला. यावरून त्याला तेथील घरमालकाने टोकले. तू सामान चोरी करून आणतो, तुझ्या वडिलांना खोली रिकामी करायला सांग असे मालक म्हणाला होता. दोन दिवसांनी अल्पवयीन आरोपी त्याच्या 'लिव्ह इन पार्टनर'सोबत आजीकडे गेला. त्याने त्याचे वडील कुठे गेले अशी विचारणा केली असता आजीने, तू वडिलांच्या खोलीवर कुणाचेही सामान का नेऊन ठेवतो असे विचारले. अल्पवयीन मुलीला त्याला सांभाळ असा सल्लादेखील तिने दिला. त्यावरून आरोपी संतापला व शिवीगाळ करू लागला.

दरम्यान, आरोपीचे वडील तिथे पोहोचले व त्यांनी स्वतःच्या आईला वाचवायला धाव घेतली. अल्पवयीन मुलाने समोर वडील आहेत याचादेखील विचार केला नाही व मी तुलादेखील संपवतो असे म्हणत त्यांनादेखील दगड फेकून मारत मारहाण केली. जर पोलिसांत तक्रार केली तर तुम्हाला ठार मारेन अशी धमकीही त्याने दिली व 'लिव्ह इन पार्टनर 'सोबत निघून गेला. या प्रकारामुळे आजी व त्याचे वडील चांगलेच हादरले. आजीने हिंमत दाखवून जरीपटका पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

त्याने एक वीट आजीच्या डोक्यावर फेकून मारली. त्यामुळे आजी खाली पडली. त्यानंतर आज तुला संपवतोच असे म्हणून त्याने मोठा दगड उचलून आणला व तो आजीच्या दिशेने फेकला. तो आजीच्या खांद्यावर पडला व ती गंभीर जखमी झाली.

पोलिसदेखील अचंबित

मागील काही काळापासून नात्यांमध्येच अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत. कधी भाऊ भावाला, तर कधी मुलगा वडिलांना मारताना दिसून येतो. दोन आठवड्यांअगोदर लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत सख्ख्या काकानेच तरुणीचा अश्लील चाळे करत विनयभंग केला होता. आणि आता 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलाचा हा प्रताप ऐकून तर पोलिसदेखील अचंबित झाले आहेत.
 

Web Title: Crime News : A minor living in a live-in home came home with his girlfriend; his grandmother and father were attacked as soon as he was told off by his grandmother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.