आता रक्षा अॅपच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:22 IST2018-05-27T01:21:52+5:302018-05-27T01:22:03+5:30
४० हजारपेक्षा जास्त समाजकंटकावर पोलिसांची नजर आहे. आता रक्षा अॅपच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले जाणार असून पीडितांना तात्काळ मदत मिळणार आहे. या अॅपच्या माध्यमातून गुन्ह्याचे फुटेजही आपसूकच कैद होतील. त्यामुळे या गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यासाठी तो महत्त्वाचा पुरावा ठरेल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले.

आता रक्षा अॅपच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ४० हजारपेक्षा जास्त समाजकंटकावर पोलिसांची नजर आहे. आता रक्षा अॅपच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले जाणार असून पीडितांना तात्काळ मदत मिळणार आहे. या अॅपच्या माध्यमातून गुन्ह्याचे फुटेजही आपसूकच कैद होतील. त्यामुळे या गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यासाठी तो महत्त्वाचा पुरावा ठरेल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले. शनिवारी सायंकाळी नियंत्रण कक्षात रक्षा अॅपचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. नियंत्रण कक्षात कार्यरत पोलीस शिपाई दुर्गेश आणि अश्विनी यांच्या हस्ते अॅपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, सहायक आयुक्त संजीव कांबळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांच्या कल्पना आणि पुढाकाराने हे अॅप बनविण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
रक्षा अॅपवर पोलीस, डॉक्टर, महापालिका आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची नावे तसेच संपर्क क्रमांक आहेत. अॅप अप्लिकेशन डाऊनडलोड करून अडचणीच्या वेळी पीडित व्यक्ती बटन दाबून क्लीक करताच ती माहिती नियंत्रण कक्ष तसेच संबंधित विभागाच्या व्यक्तींना मिळेल. घटनेची छायाचित्रे (फुटेज) सुद्धा आपोआपच संबंधित व्यक्तीच्या मोबाईलमध्ये कैद होतील. शिवाय ज्या व्यक्तीच्या, विभागाच्या मदतीची गरज आहे, त्यांना रस्ता तसेच घटनास्थळाची (लोकेशन) माहिती मिळेल. या दरम्यान, त्या भागात गस्तीवर असलेले बीट मार्शल, पोलीस तेथे पोहचतील. अडचणीच्या वेळी अतिरिक्त बळाची गरज असल्यास बीट मार्शलच्या एका क्लिकवर ती उपलब्ध होईल. याशिवाय फरार आरोपी, कोर्टातील पेशीच्या स्थिती आणि अन्य अनेक प्रकारच्या सुविधा रक्षा अॅपमध्ये आहेत. प्रायोगिक स्तरावर त्या कार्यान्वित करण्यात आल्या असून अॅपशी जुळलेल्या कर्मचाºयांना १२० स्मार्ट फोन तसेच ३० टॅब, सीमकार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार, अॅपमध्ये बदल,सुधारणा करण्यात येणार आहे.