नागपुरात सीपी थांबले बाजूला , पीसींनी केले लॉनचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:36 IST2018-04-08T00:36:44+5:302018-04-08T00:36:57+5:30

बहुतांश समारंभासाठी नेतेमंडळी किंवा मोठे अधिकारी मुख्य पाहुणे म्हणून बोलविले जातात. नियोजित कार्यक्रमाच्या किमान अर्धा तास अगोदर पोलीस कर्मचारी आणि निमंत्रित मंडळी हजर होतात. पाहुणे मात्र तास-दीड तास विलंबाने येतात. तोपर्यंत सर्वांना ताटकळत राहावे लागते. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी मात्र उत्सव लॉनचा उद्घाटन समारंभ चक्क आपल्या कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्य अतिथी म्हणून बोलवून पार पाडला.

CP stand by and PC inaugurate the Lawn | नागपुरात सीपी थांबले बाजूला , पीसींनी केले लॉनचे उद्घाटन

नागपुरात सीपी थांबले बाजूला , पीसींनी केले लॉनचे उद्घाटन

ठळक मुद्देपोलीस मुख्यालयात अनोखा समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुतांश समारंभासाठी नेतेमंडळी किंवा मोठे अधिकारी मुख्य पाहुणे म्हणून बोलविले जातात. नियोजित कार्यक्रमाच्या किमान अर्धा तास अगोदर पोलीस कर्मचारी आणि निमंत्रित मंडळी हजर होतात. पाहुणे मात्र तास-दीड तास विलंबाने येतात. तोपर्यंत सर्वांना ताटकळत राहावे लागते. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी मात्र उत्सव लॉनचा उद्घाटन समारंभ चक्क आपल्या कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्य अतिथी म्हणून बोलवून पार पाडला.
विविध समारंभासाठी लॉनचा आग्रह धरला जातो. लॉनचा काही तासांचा किराया ७० हजार ते दीड-दोन लाख रुपयांपर्यंत घेतला जातो. त्यामुळे इच्छा असूनही कनिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांच्याकडे असलेल्या कार्यक्रमासाठी लॉन भाड्याने घेऊ शकत नाही. ते लक्षात घेत डॉ. व्यंकटेशम यांनी दोन सुसज्ज लॉनची निर्मिती करून घेतली आहे. नाममात्र शुल्क घेऊन पोलिसांच्या कुटुंबातील लग्नसमारंभ तसेच अन्य कार्यक्रमासाठी ते उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी सहायक फौजदार (एएसआय) देवीदास शेळके, एएसआय मुरलीधर लिल्लारे, एएसआय भीमराव राऊत, शिपाई राममिलन पांडे, अमोल हरणे, आकाश जायभाये, कमलेश अगडे, स्वाती चराटे, माधुरी ठाकरे, पूजा लेवेकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. फलकाचे अनावरण आणि फीत कापून लॉनचे उद्घाटन या पाहुण्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मोठ्या संख्येत वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी कोणत्या योजना, कोणते उपक्रम राबविले जात आहेत, त्याची माहिती यावेळी एलसीडी प्रोजेक्टरवर दाखविण्यात आली.
मुख्यालय परिसरात पोलिसांसाठी यापूर्वी वाचनालय, हेल्थ क्लब, कॅन्टींन, पाळणाघर, पॉलिक्लीनिक, सुसज्ज अलंकार हॉलचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एसीपी अश्विनी पाटील तर आभारप्रदर्शन पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी केले.
सारेच भारावले
लॉनचा हा उद्घाटन समारंभ पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी फारच सुखद आणि अनोखा ठरला. आपल्या परिवाराच्या उपस्थितीत, पोलीस शिपाई आणि एएसआय मुख्य अतिथी म्हणून मिरवतात अन् त्यांचे वरिष्ठ बाजूला टाळ्यांचा गडगडाट करतात, हा पोलीस आयुक्तांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेला प्रसंग उपस्थितांना भारावून टाकणारा ठरला.

Web Title: CP stand by and PC inaugurate the Lawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.