कापूस आयात वाढली, दर मात्र 'एमएसपी'च्या आसपास राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:08 IST2025-08-05T13:06:55+5:302025-08-05T13:08:08+5:30

यंदा पेरणी क्षेत्र ३.३५ टक्क्यांनी घटले : आठ महिन्यांत २७ लाख गाठी कापसाची आयात

Cotton imports increased, but prices will remain around 'MSP'! | कापूस आयात वाढली, दर मात्र 'एमएसपी'च्या आसपास राहणार!

Cotton imports increased, but prices will remain around 'MSP'!

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
मागील काही वर्षापासून कापसाची उत्पादकता व उत्पादन घटत आहे. वाढता खर्च, बाजारात मिळणारा कमी दर व यातून होणारे आर्थिक नुकसान पाहता, कापसाचे पेरणी क्षेत्र देशात ३.३५ टक्क्यांनी, तर राज्यात ६.१२ टक्क्यांनी घटले आहे. त्यातच चालू कापूस हंगामाच्या पहिल्या आठ महिन्यांत २७ लाख गाठी कापसाची उच्चांकी आयात करण्यात आली. कापसाची वाढती आयात व जागतिक पातळीवर दबावात असलेले दर विचारात घेता, आगामी हंगामात कापसाचे दर 'एमएसपी'च्या आसपास स्थिरावण्याची शक्यता बळावली आहे.


१ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर हा काळ कापूस वर्ष मानले जाते. देशात कापसाचा वापर व मागणी स्थिर असल्याने १ ऑक्टोबर ते ३१ मे या आठ महिन्यांच्या काळात कापसाची उच्चांकी आयात करण्यात आली. तुलनेत निर्यात मात्र १८ लाख गाठींवर मर्यादित राहिली. सन २०२४-२५ या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाची एमएसपी ७,५२१ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली होती. वास्तवात बहुतांश शेतकऱ्यांना ६,८०० ते ७,२०० रुपयांदरम्यान कापूस विकावा लागला.


चालू हंगामासाठी कापसाची एमएसपी ८,११० रुपये जाहीर करण्यात आली आहे. सध्या मध्यम लांब धाग्याच्या रुईचे दर ५५,८०० ते ५६,५०० रुपये, तर लांब धाग्याच्या रुईचे दर ५६,६०० ते ५७,००० प्रतिखंडी असून, सरकीचे दर ३,६०० ते ४,५४० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान असल्याने कापसाला सरासरी ७,३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. हेच दर आगामी तीन महिन्यांपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, सरकीचे दर कमी झाल्यास कापसाला प्रतिक्विंटल ७,२०० तर वाढल्यास ७,५०० रुपयांच्या आसपास दर मिळू शकतो. 


कापसाचे सरासरी दर व एमएसपी (रुपये/प्रतिक्विंटल)
वर्ष                        दर                एमएसपी
२०१९-२०             ५,३८७               ५,५५०
२०२०-२१              ५,४३०              ५,८२५
२०२१-२२              ८,९५८              ६०२५
२०२२-२३              ७,७७६             ६,३८०
२०२३-२४               ७,३५०            ७,०२०
२०२४-२५              ७,२५२             ७,५२१


देश व कापसाची आयात
ब्राझील - ७.५० लाख गाठी
अमेरिका - ५.२५ लाख गाठी
ऑस्ट्रेलिया - ५.०० लाख गाठी
माली - १.७९ लाख गाठी
इजिप्त - ८३ हजार गाठी


कापसाची आयात व निर्यात (लाख गाठी)
हंगाम               आयात                 निर्यात
२०१९-२०           १५.५०                ४६.०४
२०२०-२१           ११.०३                 ७७.५९
२०२१-२२           २१.००                 ४३.००
२०२२-२३           १४,००                ३०,००
२०२३-२४           २२.००               २८.३६
२०२४-२५           २७.००               १८,००

Web Title: Cotton imports increased, but prices will remain around 'MSP'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.