मनपाच्या झोन कार्यालयांचे कामकाज ठप्प : होम क्वारंटाईन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 22:48 IST2020-10-28T22:47:22+5:302020-10-28T22:48:40+5:30
Home quarantine agitation in NMC, Nagpur news सातवा वेतन आयोग लागू करावा, कर्मचाऱ्याची भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करावी, थकीत भत्ता देण्यात यावा, यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी बुधवारी महापालिका कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या होम क्वारंटाईन आंदोलनात कर्मचारी उस्फूर्तपणे सहभागी झाले.

मनपाच्या झोन कार्यालयांचे कामकाज ठप्प : होम क्वारंटाईन आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सातवा वेतन आयोग लागू करावा, कर्मचाऱ्याची भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करावी, थकीत भत्ता देण्यात यावा, यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी बुधवारी महापालिका कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या होम क्वारंटाईन आंदोलनात कर्मचारी उस्फूर्तपणे सहभागी झाले. यामुळे मनपाच्या सर्व १० झोन कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले. तसेच मुख्यालयात सर्वत्र शुकशुकाट असल्याने कामकाजवर परिणाम झाला आहे.
राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनच्या आवाहनानुसार पुकारलेल्या आंदोलनात मनपातील वर्ग -३ व वर्ग-४ चे ९५ टक्के कर्मचारी सहभागी झाले.यामुळे पदाधिकाऱ्यांचे कक्ष बंद होते.काही पदाधिकारी आल्यावर ते उघडले. संघटनेच्या दाव्यानुसार ३ हजाराहून अधिक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कंत्राटी ऑपरेटर व आवश्यक सेवेतील कर्मचारी कामावर असल्याने प्रशासनाला कार्यालय उघडे ठेवता आले.
प्रशासनाच्या इशाऱ्याला न जुमानता सहभाग
आंदोलनात सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सुटीसाठी सामूहिक अर्ज दिले आहेत. परंतु मनपा उपायुक्त निर्भय जैन यांनी सामूहिक रजा नामंजूर करून रजा घेणाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा इशारा दिला होता. मात्र या इशाऱ्याला न जुमानता कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले यातून कर्मचाऱ्यांचा प्रशासन व पदाधिकाऱ्यांवर रीष असल्याचे दिसून येते.
आवश्यक सेवेतील कर्मचारी काळ्या फिती लावून
होम क्वारंटाईन आंदोलनसाठी संघटनेने सामूहिक रजेवर जाण्याची सूचना प्रशासाला दिली होती.मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याना यातून वगळण्यात आले होते. त्यांनी काळ्या फिती लावून प्रशासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध केला. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, रंजन नलोडे व प्रवीण तत्रपाळे यांनी दिली.