मनपाचे कर्मचारी २ डिसेंबरला सायकलने कार्यालयात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:10 IST2020-11-28T04:10:34+5:302020-11-28T04:10:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी येत्या २ डिसेंबरला ...

मनपाचे कर्मचारी २ डिसेंबरला सायकलने कार्यालयात येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी येत्या २ डिसेंबरला सायकलने कार्यालयात येतील, अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. यानंतरही दर महिन्याला किमान एकदिवस मनपाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सायकलने कार्यालयात यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
भोपाळ गॅस कांडात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मृतीत "राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस" दरवर्षी पाळण्यात येतो. वर्ष १९८४ मध्ये २ आणि ३ डिसेंबरच्या रात्रीला विषारी गॅस गळतीने असंख्य नागरिकांचा मृत्यू झाला होता.
या अभियानाबद्दल माहिती देताना जोशी यांनी सांगितले की, नागपुरात वायु प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याचे दृष्टिकोनातून हा प्रयत्न केला जाईल. सायकलने कार्यालयात आल्यावर प्रदूषण तर कमी करण्यास मदत होईल तसेच आरोग्यपण उत्तम ठेवता येईल. अधिकारी व कर्मचारी कार्यालयाचे वेळेवर सकाळी ९.३० ते ९.४५ वाजेपर्यंत सायकलने येतील. सोबतच शहरातील इतर नागरिकांनीही "राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिना" निमित्त २ डिसेंबर रोजी वाहनाने होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण राखण्यास "सायकल-दिवस" पाळावा असे आवाहनही त्यांनी केले.