CoronaVirus News : कोरोनामुळे मराठा सेवा संघाचे दोन शिलेदार गमावले; रामभाऊ बळी, अण्णासाहेब भोयर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 07:47 IST2021-04-17T07:47:04+5:302021-04-17T07:47:34+5:30
CoronaVirus News: मराठा सेवा संघाचे दोन शिलेदार असे अचानक गमावल्याने मराठा समाजात दु:खाचे सावट पसरले आहे.

CoronaVirus News : कोरोनामुळे मराठा सेवा संघाचे दोन शिलेदार गमावले; रामभाऊ बळी, अण्णासाहेब भोयर यांचे निधन
नागपूर : मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासूनच आपल्या रक्ताचे पाणी आटवत संस्थेच्या प्रचार-प्रसारार्थ आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दोन मोती कोरोनाच्या वावटळीत गळाले आहेत. मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष रामभाऊ बळी व संघाच्या स्थापनेपासूनच कार्यरत असणारे यवतमाळचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब भोयर यांचे कोरोना संक्रमणामुळे निधन झाले. मराठा सेवा संघाचे दोन शिलेदार असे अचानक गमावल्याने मराठा समाजात दु:खाचे सावट पसरले आहे.
मराठा सेवा संघासोबतच कौटुंबिक सामाजिक पातळीवरील विविध जबाबदाऱ्या पार पाडत या ज्येष्ठांनी समृद्ध वारसा नवीन पिढीला प्रेरणा मिळावा म्हणून हस्तांतरित केला आहे. एचबी इस्टेट, सोनेगाव येथील निवासी रामभाऊ बळी मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष व जिजाऊ बँकेचे संस्थापक संचालक होते. प्रबोधन, संघटनाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला जोडण्याचे कार्य केले. ते कृषी विभागात संचालक पदावर कार्यरत होते. कायम हसतमुख असणारे व कसलीही तक्रार न करणारे रामभाऊ असे त्यांचा सर्वपरिचय होता. त्यांच्या पश्चात पत्नी रोहिणी बळी व एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ८५ वर्षीय अण्णासाहेब भोयर हे मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून संघाचे शिलेदार म्हणून कार्यरत होते. सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत असताना ते सेवानिवृत्त झाले. घरची परिस्थिती बेताची असताना व प्रकृती बरी नसतानाही त्यांनी २० वर्षांपूर्वी सिंदखेडराजा येथे जिजाऊ सृष्टी निर्माणात भरीव अशी आर्थिक देणगी दिली होती. ते नागपूरलाच राहायचे.
दिलदार मनाचे दोन मोती
अण्णासाहेब भोयर व रामभाऊ बळी हे दोन्ही ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक होते. त्यांच्या मार्गदर्शनात अनेक कार्य झाले. ते मराठा सेवा संघाचे आधारवड होते. त्यांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत.
- मधुकर मेहकरे, प्रदेश महासचिव, मराठा सेवा संघ