Coronavirus in Nagpur ; धक्कादायक! म्युकरमायकोसिसच्या ३५ रुग्णांचे काढावे लागले डोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 07:56 IST2021-05-11T07:56:13+5:302021-05-11T07:56:45+5:30
Nagpur News कोरोनातून बरे झाल्यानंतर काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे काळी बुरशी नावाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. अनियंत्रित मधुमेह व स्टेराॅईडचा अधिक डोस घेणाऱ्यांमध्ये हा आजार वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Coronavirus in Nagpur ; धक्कादायक! म्युकरमायकोसिसच्या ३५ रुग्णांचे काढावे लागले डोळे
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनातून बरे झाल्यानंतर काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे काळी बुरशी नावाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. अनियंत्रित मधुमेह व स्टेराॅईडचा अधिक डोस घेणाऱ्यांमध्ये हा आजार वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्वी वर्षातून एखाददुसरा म्युकरमायकोसिसचा रुग्ण आढळायचा. परंतु आता आठवड्याला साधारण २० ते २५ रुग्णांची नोंद होत आहे. धक्कादायक म्हणजे, मागील तीन महिन्यात खासगी आणि शासकीय रुग्णालये मिळून ३५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करून एक डोळा काढण्याची वेळ आली.
कोरोना विषाणूवर यशस्वी उपचारानंतर म्युकरमायकोसिससारख्या आजाराची गुंतागुंत वाढत असल्याने आरोग्य क्षेत्रात चिंता वाढली आहे. म्युकरमायकोसिस हे फंगल इन्फेक्शन आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमधील अनियंत्रित मधुमेह, रक्तदोष, एखाद्या अंगाचे प्रत्यारोपण, एड्स व कुपोषित व्यक्तीलाही या आजाराचा धोका असतो. याशिवाय स्टेरॉईडचा हेवी डोज घेणाऱ्यांमध्येही हा आजार दिसून येतो. साधारण हजार कोरोना रुग्णांमध्ये २० म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहेत. या आजाराचे लवकर निदान झाल्यास हा आजार बरा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- ५० टक्के रुग्णांवर डोळा गमाविण्याची वेळ
शहरातील एका खासगी रुग्णालयात मागील तीन महिन्यात म्युकरमायकोसिसच्या ६२ रुग्णांची नोंद झाली. यातील ३४ रुग्णांच्या डोळ्याच्या आतपर्यंत फंगस गेल्याने शस्त्रक्रिया करून एक डोळा काढण्याची वेळ आली. साधारण ५० टक्के रुग्णांना आपला डोळा गमवावा लागला. हे सर्व रुग्ण नागपूर जिल्ह्यातील असून, २२ ते ९० वर्षे वयोगटातील असल्याची माहिती संबंधित खासगी रुग्णालयातील डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. मेयोमध्येही एका रुग्णावर शस्त्रक्रिया करून डोळा काढावा लागला.
- मेयो, मेडिकल व डेन्टलमध्ये वाढत आहेत रुग्ण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) नोव्हेंबर २०२० ते १० मे २०२१ पर्यंत ३४ रुग्णांची नोंद झाली. यातील १० रुग्णांवर ईएनटी विभागाकडून शस्त्रक्रिया झाल्या. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) म्युकरमायकोसिसच्या नऊ रुग्णांची नोंद झाली असून, यातील सहा रुग्णांवर ईएनटी विभागाने शस्त्रक्रिया केल्या. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात (डेन्टल) जानेवारी ते आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या ४९ रुग्णांची नोंद झाली. यातील १७ रुग्णांवरील जबड्याच्या हाडावर शस्त्रक्रिया करावी लागली. खासगी रुग्णालयाची शासनदरबारी नोंद होत नसल्याने त्याचा डेटा उपलब्ध होऊ शकला नाही.
- लक्षणे
डोळ्याच्या भागात दुखणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, डोक्याच्या समोरच्या भागात दुखणे, चेहरा व विशेषत्वाने गालावर दुखणे, नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, दात हलणे व दात दुखणे.
- घ्यावयाची काळजी
रुग्णांनी लक्षणे दिसताच डोळ्याचे डॉक्टर किंवा कान, नाक व घसा (ईएनटी) तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा. वेळीच तपासणी व उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो.