Coronavirus in Nagpur; २० टक्क्यांनी वाढले पक्षाघाताचे रुग्ण; कोरोनामुळे रुग्ण वाढल्याचे मेंदूरोग तज्ज्ञांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 07:00 IST2021-05-25T07:00:00+5:302021-05-25T07:00:10+5:30
Nagpur News कोरोनाचा दुसऱ्या लाटेत जुने आजार उफाळून येत असताना आता यात पक्षाघात म्हणजे ‘स्ट्रोक’नेही डोके वर काढले आहे. या आजारात मागील वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्याने वाढ झाल्याचे मेंदूरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Coronavirus in Nagpur; २० टक्क्यांनी वाढले पक्षाघाताचे रुग्ण; कोरोनामुळे रुग्ण वाढल्याचे मेंदूरोग तज्ज्ञांचे मत
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेत जुने आजार उफाळून येत असताना आता यात पक्षाघात म्हणजे ‘स्ट्रोक’नेही डोके वर काढले आहे. या आजारात मागील वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्याने वाढ झाल्याचे मेंदूरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर, १०८ रुग्णवाहिकेने जानेवारी ते एप्रिल २०२० या काळात ६७० तर यावर्षी याच कालावधीत ८४५ ‘स्ट्रोक’च्या रुग्णांवर उपचार करून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. जवळपास २०.७ टक्क्यांनी रुग्णांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
पक्षाघातामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण जगात दुुसऱ्या नंबरवर आहे. पक्षाघात हा अतिशय घातक आजार आहे. जगात दर २ सेकंदाला एकाला पक्षाघात होतो. जगात दरवर्षी १ कोटी ५० लक्ष लोकांना पक्षाघात होतो. त्यापैकी ६० लाख लोक दगावतात. यातील ८० टक्के रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशातील असतात. भारतात दर मिनिटाला ६ लोकांना पक्षाघात होतो. म्हणजे दरवर्षी देशात २० लाख लोक या आजाराने बळी पडतात. पक्षाघात हा कुठल्याही वयात होऊ शकतो. जगाच्या तुलनेत भारतामध्ये पक्षाघात होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. २० टक्के रुग्ण हे ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात. आता यात कोरोनाची भर पडल्याने पक्षाघाताच्या रुग्णांत वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यात वयोवृद्ध, मधुमेह व उच्चरक्तदाब असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे.
-चार महिन्यांत ८४५ स्ट्रोकचे रुग्ण
आपत्कालीन रुग्णसेवा देणाऱ्या (एमईएमएस) १०८ रुग्णवाहिकेकडून जानेवारी ते एप्रिल २०२० मध्ये भंडाऱ्यातील ४४, चंद्रपूरमधील १६५, गडचिरोलीतील ४६, गोंदियातील १२१, नागपुरातील २२९ तर वर्धेतील ६५ असे एकूण ६७० पक्षाघाताच्या रुग्णांना सेवा दिली. तर जानेवारी ते एप्रिल २०२१ याच कालावधीत भंडाऱ्यातील ८१, चंद्रपूरमधील २४०, गडचिरोलीतील ९१, गोंदियातील १०१, नागपुरातील २८६ तर वर्धेतील ४६ पक्षाघाताच्या रुग्णांना मदत केली. मागील वर्षी या चार महिन्यात ६७० तर यावर्षी त्यात वाढ होऊन ८४५ रुग्णांवर उपचार करीत त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यात आले आहे.
-‘स्ट्रोक’चे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले
कोरोना होऊन गेलेल्या वयोवृद्ध, मधुमेह, उच्च रक्तदाबासह इतरही आजारांच्या रुग्णांमध्ये स्ट्रोकचे प्रमाण ५० टक्क्यानी वाढल्याचे दिसून येत आहे. ज्या कोरोनाचा रुग्णाला स्टेरॉईड दिले जाते त्यांच्यामधील रक्तात साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे रक्त घट्ट होऊन छोट्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. परिणामी स्ट्रोक येतो. यामुळे कुठलेही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्ट्रोक आल्यास तातडीने हॉस्पिटल गाठा. ज्यांना कोविड झाला त्यांच्यामध्ये ‘डी-डायमर’ वाढले असेल त्यांनी लागलीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
-डॉ. चंद्रशेखर मेश्राम, वरिष्ठ मेंदूरोग तज्ज्ञ