Coronavirus in Nagpur: 1,393 patients positive; Worrying | CoronaVirus in Nagpur : १,३९३ रुग्ण पॉझिटिव्ह ; चिंताजनक

CoronaVirus in Nagpur : १,३९३ रुग्ण पॉझिटिव्ह ; चिंताजनक

ठळक मुद्दे२५ सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच बाधितांची मोठी भर : कोरोनाचे १० हजार रुग्ण अ‍ॅक्टिव्ह

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : वाढती रुग्णसंख्या नागपूरकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. शुक्रवारी १,३९३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. २५ सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १,५५,२७५ झाली असून आज ९ रुग्णांच्या मृत्यूंने मृतांची संख्या ४,३७४ झाली. रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

नागपूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी हजार नवे रुग्ण आढळून आले. रुग्णांच्या वाढत्या संख्येने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. आज ७,९७६ आरटीपीसीआर, ३,५३२ रॅपिड अन्टिजेन अशा एकूण ११,५०८ कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या. आरटीपीसीआरमधून १,३३२ तर ॲन्टिजेनमधून ६१ रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. चाचण्यांच्या तुलनेत १२.१० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. ५८३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १,४०,४६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. बरे होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणातही घट आली आहे. हा दर ९०.४६ टक्क्यांवर आला आहे.

शहरात ११७२ तर ग्रामीणमध्ये २१९ नवे रुग्ण

शहरात आज ११७२, ग्रामीणमध्ये २१९ तर जिल्ह्याबाहेरील २ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मृतांमध्ये शहरातील ५, ग्रामीण व जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी २ मृत्यू आहेत. शहरात आतापर्यंत १,२३,९०१ रुग्ण व २,८२२ मृत्यू तर ग्रामीणमध्ये ३०,४१९ रुग्ण व ७७९ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत.

सप्टेंबरमध्ये एकाच दिवशी २,३४३ रुग्णांची नोंद

कोरोनाच्या बारा महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक रुग्णांची नोंद सप्टेंबर महिन्यात झाली. विशेष म्हणजे, १३ सप्टेंबर रोजी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. तब्बल २,३४३ रुग्णांची नोंद झाली व ४५ रुग्णांचे बळी गेले होते. २५ सप्टेंबरनंतर रुग्णसंख्येत घट येऊ लागली, त्यानंतर पहिल्यांदाच १३०० वर रुग्णसंख्या गेली.

दहा दिवसांत असे वाढले रुग्ण

मागील दहा दिवसांत दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली आहे. २४ फेब्रुवारी रोजी ११८१, २५ फेब्रुवारी रोजी १११६, २६ फेब्रुवारी रोजी १०७४, २७ फेब्रुवारी रोजी ९८४, २८ फेब्रुवारी रोजी ८९९, १ मार्च रोजी ८७७, २ मार्च रोजी ९९५, ३ मार्च रोजी ११५२, ४ मार्च रोजी १०७० तर ५ मार्च रोजी १३९३ रुग्णांची नोंद झाली.

६.७१ टक्के रुग्ण अ‍ॅक्टिव्ह

वाढत्या रुग्णसंख्येसोबतच अ‍ॅक्टिव्ह म्हणजे कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शुक्रवारी सक्रिय रुग्णांची संख्या १० हजारांवर जाऊन १०४३२ झाली. एकूण रुग्णसंख्येच्या हे प्रमाण ६.७१ टक्के आहे. यातील ८५३७ रुग्ण शहरात तर १८९५ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. २०१९ रुग्ण रुग्णालयात भरती असून ७५१३ रुग्ण होम आयसालेशनमध्ये आहेत.

दैनिक चाचण्या : ११,५०८

बाधित रुग्ण : १,५५,२७५

बरे झालेले : १,४०,४६९

 उपचार घेत असलेले रुग्ण : १०,४३२

मृत्यू : ४,३७४

Web Title: Coronavirus in Nagpur: 1,393 patients positive; Worrying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.