Coronavirus in Nagpur; नागपूर शहरात बेघर व भिकारी लोकांची कोरोना चाचणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 09:32 AM2021-05-07T09:32:31+5:302021-05-07T09:32:54+5:30

Nagpur News नागपूर महापालिकेने शहरातील बेघर व भिकारी यांचा शोध घेऊन त्यांचीही चाचणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

Corona testing campaign for homeless and beggars in Nagpur city | Coronavirus in Nagpur; नागपूर शहरात बेघर व भिकारी लोकांची कोरोना चाचणी मोहीम

Coronavirus in Nagpur; नागपूर शहरात बेघर व भिकारी लोकांची कोरोना चाचणी मोहीम

Next
ठळक मुद्देसंक्रमणाला आळा घालण्यासाठी महापालिकेची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील १४ महिन्यांपासून कोरोना संकट आहे. एप्रिल महिन्यात नागपूर शहरात संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी टेस्टिंग व ट्रेसिंग वाढविण्याची गरज आहे. याचा विचार करता महापालिकेने शहरातील बेघर व भिकारी यांचा शोध घेऊन त्यांचीही चाचणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

या लोकांच्या शहराच्या विविध भागांत संचार असतो. यात ते पॉझिटिव्ह असल्यास संक्रमणाचा धोका अधिक असल्याने अशा स्प्रेडर्सचा शोध घेणे गरजेचे आहे. महापालिकेच्या धरमपेठ झोनच्या आरोग्य पथकाने ४७ बेघर व भिकाऱ्यांचे स्राव घेतले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात रामनगर परिसरातील हनुमान मंदिर, छोटा निम दर्गा व यशवंत स्टेडियम परिसरात वास्तव्यास असलेल्या बेघर व भिकाऱ्यांचा समावेश आहे. कोरोना चाचणीला या लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. यासाठी या लोकांना प्रवृत्त करून त्यांचे स्राव घेण्यात आले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय निमाने यांनी महापालिकेच्या सर्व १० झोनच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील बेघर व भिकारी लोकांचे सर्वेक्षण करून त्यांची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहे. बेघर व भिकारी लोकांची दिवसभर भटकंती सुरू असते. यात काहीजण पॉझिटिव्ह असल्यास संक्रमणाचा धोका लक्षात घेता या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. बेघर लोकांचा शहरातील चौकात व वर्दळीच्या ठिकाणी वावर असल्याने संक्रमणाचा अधिक धोका आहे. केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार सर्व झोन अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील बेघर, भिकारी व मजुरांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती संजय निपाणे यांनी दिली.

ठिय्यावरील मजुरांचीही तपासणी

शहराच्या विविध भागांतील ठिय्यावर मजुरांची गर्दी असते. सकाळी सातपासून तर ११ पर्यंत कामाच्या प्रतीक्षेत मजूर बसून असतात. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मजूर एकत्र येत असल्याने अशा ठिकाणी संक्रमणाचा धोका आहे. याचा विचार करता मजुरांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश झोन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

Web Title: Corona testing campaign for homeless and beggars in Nagpur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app