लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यामध्ये ‘कोरोना’ची भीषणता वाढतच असून रविवारी ७ हजार १०७ नवे बाधित आढळले. तर २४ तासांत तब्बल ८५ मृत्यूंची नोंद झाली. यातील ३९ टक्के मृत्यू ग्रामीण भागातील होते. संपूर्ण जिल्ह्यात ‘अॅक्टिव्ह’ रुग्णांची संख्या ६९ हजारांहून अधिक झाली आहे.
रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात २६ हजार ७९२ नमुन्यांची तपासणी झाली. त्यातील ७ हजार १०७ लोकांची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली. बाधितांमध्ये २ हजार ४९८ ग्रामीण भागातील तर ४ हजार ६०२ शहरातील आहेत. मृतकांमध्ये ३३ जण ग्रामीणमधील तर ४५ जण जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्याबाहेरील सात जणांचा समावेश आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या ३ लाख २३ हजार १०६ वर पोहोचली असून मृत्यूचा आकडा ६ हजार २७३ वर गेला आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६९ हजार २४३ इतकी झाली आहे. यात शहरातील ४१ हजार ७७९ रुग्णांचा समावेश आहे. विविध रुग्णालयात १५ हजार २४७ ‘पॉझिटिव्ह’ भरती आहेत. तर ५३ हजार ९९६ रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत.
३,९८७ रुग्ण बरे
रविवारी ३ हजार ९८७ रुग्ण बरे झाले. यात शहरातील २,८७८ तर ग्रामीणमधील १,१०९ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ४७ हजार ५९० इतकी आहे.