राजीव सिंह
नागपूर : कोविड संक्रमणाचा सर्वाधिक फटका मनपाच्या उत्पन्नाला बसला. संक्रमणाच्या नऊ महिन्याच्या कालावधीत २९५.२५ कोटींनी महसूल घटला. परंतु महिनानिहाय उत्पन्नावर नजर टाकल्यास कोविड संक्रमण नियंत्रणात येताच उत्पन्न वाढले, तर रुग्णांची संख्या वाढताच उत्पन्न कमी झाले.
वर्ष २०१९ व २०२० एप्रिल ते डिसेंबर महिन्यातील आकडेवारीचा विचार करता परिस्थिती स्पष्ट होते. वर्ष २०१९ च्या सुरुवातीच्या नऊ महिन्यात मनपाचे उत्पन्न १६८८.४९ कोटी होते. तर वर्ष २०२० मध्ये या कालावधीत १३९३.२४ कोटी मनपा तिजोरीत जमा झाले. नागपुरात ११ मार्च २०२० रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळला. मार्च महिन्यात फक्त १६ रुग्ण आढळले होते. परंतु एप्रिल, मे महिन्यात कोविडची भीती वाढत गेली. या कालावधीत लॉकडाऊन अधिक कडक होते. एप्रिलमध्ये १२.९५ कोटी, मे महिन्यात २५०.८५ कोटीचे उत्पन्न कमी झाले. जून महिन्यात नागपूरचा रिकव्हरी रेट देशात सर्वाधिक चांगला झाला होता. ८० टक्क्याहून अधिक रुग्ण बरे झाले होते. असे वाटत होते नागपूर शहरातील संक्रमण संपण्याच्या मार्गावर आहे. यामुळे जून महिन्यात २०१९ च्या तुलनेत उत्पन्न ९.८१ कोटींनी अधिक झाले. परंतु जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात संक्रमण वाढताच उत्पन्न पुन्हा कमी झाले. यामुळे या कालावधीत मनपाच्या उत्पन्नावर परिणाम झाला.
मनपाला वषं २०१९ च्या तुलनेत २०२० च्या जुलैमध्ये १२.४२ कोटी, ऑगस्टमध्ये ८.१७, सप्टेंबरमध्ये ११.३७ कोटीचे उत्पन्न झाले. तर ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात संक्रमण कमी होताच ऑक्टोबर महिन्यात २०.८५ कोटी तर नोव्हेंबर महिन्यात २.५६ कोटीचे उत्पन्न अधिक झाले. दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यात संक्रमण पुन्हा वाढले. याचा उत्पन्नावरही परिणाम झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत वर्ष २०२० च्या डिसेंबर महिन्यात ३२.६९ कोटींनी उत्पन्न घटले. यावरून कोविड संक्रमण वाढण्यासोबतच मनपाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
....