भर उन्हाळ्यात नागपूर ‘कूल कूल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:48 IST2019-04-16T23:47:34+5:302019-04-16T23:48:48+5:30
उपराजधानीतील एप्रिल महिन्यातील गरमीमुळे अनेकजण उन्हाळ्याच्या सुटीत ‘हिलस्टेशन’कडे धाव घेतात. परंतु मागील २४ तासात नागपूरने भर उन्हाळ्यात पावसाळी वातावरण अनुभवले. आकाशात आलेले ढग, सुटलेला वारा व सकाळी झालेल्या पावसामुळे शहरात थंडावा जाणवत होता. पारादेखील ४० अंश सेल्सिअसच्या खाली उतरल्याचे चित्र होते.

भर उन्हाळ्यात नागपूर ‘कूल कूल’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील एप्रिल महिन्यातील गरमीमुळे अनेकजण उन्हाळ्याच्या सुटीत ‘हिलस्टेशन’कडे धाव घेतात. परंतु मागील २४ तासात नागपूरने भर उन्हाळ्यात पावसाळी वातावरण अनुभवले. आकाशात आलेले ढग, सुटलेला वारा व सकाळी झालेल्या पावसामुळे शहरात थंडावा जाणवत होता. पारादेखील ४० अंश सेल्सिअसच्या खाली उतरल्याचे चित्र होते.
सोमवारी रात्रीच्या सुमारास काही ठिकाणी पाऊस झाला तर मंगळवारी सकाळी शहरात सर्वत्रच पाऊस झाला. त्यामुळे उकाडा कमी झाला व कमाल तापमान ३८.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सरासरीच्या तुलनेत हे तापमान तीन अंशांहून कमी होते. किमान तापमानातदेखील सरासरीहून एका अंशाने घट झाली व २२.८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. २४ तासात नागपुरात १.४ मि.मी.पावसाची नोंद झाली. सकाळी ११ वाजेनंतर ऊन तापायला लागले होते. मात्र दुपारी ढग दाटून आले होते. दिवसभर उनसावलीचा खेळ सुरू होता. सायंकाळी परत वातावरण थंड झाले.
नागपुरातील ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता असून वाऱ्यांसह पाऊस येण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.