नामफलकावर ‘पुर्व नागपूर’ लिहिण्याचा वाद, कॉंग्रेसचे विधानपरिषद आमदार अभिजीत वंजारींच्या कार्यालयाला फासले काळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 23:34 IST2025-08-31T23:33:43+5:302025-08-31T23:34:23+5:30
भाजप कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप

नामफलकावर ‘पुर्व नागपूर’ लिहिण्याचा वाद, कॉंग्रेसचे विधानपरिषद आमदार अभिजीत वंजारींच्या कार्यालयाला फासले काळे
योगेश पांडे - नागपूर
नागपूर : विधानपरिषदेचे सदस्य असूनदेखील कार्यालयाच्या नामफलकावर अभिजीत वंजारी यांनी पुर्व नागपुर असा उल्लेख केल्याचा वाद चांगलाच तापला आहे. भाजयुमोकडून या फलकावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर रविवारी अज्ञात लोकांनी वंजारी यांच्या कार्यालयातील दरवाजा व नामफलकावर काळे फासले. यावरून कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतापले असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप केला आहे. नागपूर शहर (जिल्हा )काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी सकाळी सतरंजीपूरा येथील सुभाष पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. एकूणच या प्रकारामुळे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
वंजारी यांचे सेंट्रल एव्हेन्यू येथील आंबेडकर चौकात जनसंपर्क कार्यालय आहे. वंजारी हे विधानपरिषद सदस्य आहे. त्यांनी कार्यालयाच्या फलकावर आमदार अभिजीत वंजारी यांचे जनसंपर्क कार्यालय, पूर्व नागपुर विधानसभा क्षेत्र असे लिहीले आहे. यावर भाजयुमोचे वर्धमान मंडळाचे अध्यक्ष हर्षल वाडेकर, पारडी मंडळ अध्यक्ष गोविंदा काटेकर व वाठोडा मंडळ अध्यक्ष हर्षद मलमकर यांनी आक्षेप घेत १८ ऑगस्ट रोजी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. वंजारी हे स्वत:ला पुर्व नागपुरचे आमदार असल्याचे दाखवत असून ही नियमांची पायमल्ली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. रविवारी अज्ञात आरोपींनी वंजारी यांच्या कार्यालयाच्या फलकावर काळे फासले तसेच शटरवर विरोधाच्या घोषणा लिहील्या. हा प्रकार वाऱ्यासारखा कॉंग्रेस वर्तुळात पसरला. कॉंग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी भाजप कार्यकर्त्यानीच हा प्रकार केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार केली. यावेळी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपायुक्त राहुल मदने यांचीदेखील भेट घेत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकाराविरोधात नागपूर शहर (जिल्हा )काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी सकाळी सतरंजीपूरा येथील सुभाष पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष आ.विकास ठाकरे यांनी सांगितले.
खोपडे विरुद्ध वंजारी वाद तापण्याची चिन्हे
अभिजीत वंजारी यांनी पुर्व नागपुरातून २०१४ साली विधानसभा निवडणूक लढविली होती. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर खोपडे व वंजारी यांच्यात पुर्व नागपुरच्या विकासकामांमुळे अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले. बेंचला पेंट मारण्यावरूनही दोन्ही नेत्यांमध्ये वाद रंगला होता. आपण लावलेल्या बेंचला आ. वंजारी यांनी पेंट मारून स्वत:चे नाव लिहिल्याचा आरोप खोपडे यांनी केला होता.