वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 00:18 IST2025-11-09T00:17:38+5:302025-11-09T00:18:25+5:30
जोशी यांच्या साडीवर पाणी टाकणे, त्यांना चिमटे काढणे, धक्का देणे आदी प्रकार केंद्रीय मंत्री गडकरींच्या उपस्थितीत घडला. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार अनेकांनी मोबाइलच्या कॅमेरात कैद केला.

वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
नरेश डोंगरे
नागपूर : वादग्रस्त ठरलेल्या पोस्ट मास्तर जनरल (पीएमजी) शोभा मधाळे यांना अखेर डाक विभागाने (टपाल खात्याने) निलंबित केले. त्यांच्या निलंबनाचे वृत्त आल्यानंतर टपाल खात्यात चांगलीच खळबळ निर्माण झाली. २४ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात देशभरातील विविध शहरांमध्ये रोजगार मेळ्यांचा आयोजन करण्यात आले होते. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. याच मंचावर असलेल्या पोस्ट मास्तर जनरल आणि कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी सुचिता जोशी यांना सोफ्यावरून हुसकावून लावण्यासाठी मधाळे यांनी असभ्य वर्तन केले होते.
जोशी यांच्या साडीवर पाणी टाकणे, त्यांना चिमटे काढणे, धक्का देणे आदी प्रकार केंद्रीय मंत्री गडकरींच्या उपस्थितीत घडला. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार अनेकांनी मोबाइलच्या कॅमेरात कैद केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संबंधित वर्तुळात खळबळ निर्माण झाली होती. ‘लोकमत’ ने २५ ऑक्टोबरच्या अंकात हे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर मधाळे यांनी केलेल्या असह्य छळामुळे डॉ. वसुंधरा गुल्हाने या उच्चपदस्थ महिलेचा करुण अंत झाल्याचा आरोप वसुंधरा यांचे पती पुष्पक मिठे यांनी केला होता. तशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ ने २८ ऑक्टोबरच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर समाजाच्या सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. मधाळे यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणीही सर्व स्तरातून करण्यात आली होती.
दरम्यान, या सर्व प्रकरणाचा अहवाल स्थानिक अधिकाऱ्यांनी संचार मंत्रालयाला पाठविला. त्याची गंभीर दखल घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर, शोभा मधाळे यांना अनिश्चित कालावधीसाठी निलंबित करण्यात आल्याचे वृत्त गुरुवारी सायंकाळी आले.
स्थानिक अधिकाऱ्यांची लपवाछपवी
मधाळे यांना निलंबित करण्यात आल्याच्या वृत्ताने सर्वत्र खळबळ निर्माण झाली असताना स्थानिक अधिकाऱ्यांनी मात्र त्या संबंधाने लपवाछपवी केली.
शुक्रवारी या वृत्ताच्या संबंधाने स्थानिक अधिकाऱ्यांकडे अनेकांनी विचारणा केली. शहानिशा करण्यासाठी अनेक पत्रकारांनी संपर्क केला. मात्र, फोनवर प्रतिसाद देण्याची तसदी स्थानिक अधिकाऱ्यांनी घेतली नाही.
वादाचे मुळ कारण
डॉ. वसुंधरा गुल्हाने यांच्या मृत्यूनंतर झालेल्या घडामोडीमुळे शोभा मधाळे यांची ८ सप्टेंबर २०२५ रोजी उत्तर कर्नाटकमधील धारवाड येथे बदली करण्यात आली होती. मधाळे यांनी सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन ट्रिब्यूनल (कॅट) मध्ये आव्हान दिले. त्यानंतर कॅटने बदलीला स्थगिती दिली. दुसरीकडे नागपूरच्या पीएमजीचा कार्यभार नवी मुंबईच्या पीएमजी सुचिता जोशी यांना सोपविला होता. जोशी यांनाच नोडल अधिकारी म्हणून त्या कार्यक्रमासाठी नेमले होते. असे असूनही मधाळे यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीतच असभ्य वर्तन केले होते.
मधाळे म्हणतात...
या संबंधाने मधाळे यांच्याशी संपर्क साधला असता रोजगार मेळ्यात जे झाले, त्या संबंधाने कारवाई करण्याआधी विभागाने माझी बाजू ऐकावी, अशी विनंती मी केली होती. २६ ऑक्टोबर रोजी विभागाला पत्रही पाठवले होते, अशी माहिती वजा प्रतिक्रिया त्यांनी दिली.