सरकारसाठी खुर्च्या तयार करताहेत दृष्टिहीन; विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीमध्ये योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2022 16:03 IST2022-11-30T15:55:38+5:302022-11-30T16:03:07+5:30
मंत्री व मोठे अधिकारी हल्ली कुशनच्या खुर्च्या वापरतात, परंतु इतर कर्मचाऱ्यांसाठी आजही केनच्याच खुर्च्यांचा उपयोग

सरकारसाठी खुर्च्या तयार करताहेत दृष्टिहीन; विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीमध्ये योगदान
कमल शर्मा
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाकरिता उपराजधानीत येत असलेल्या सरकारसाठी केनच्या खुर्च्या तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. याकरिता दृष्टिहीनांचे अनेक हात एकत्रितपणे राबत आहेत.
राज्य सरकारने विधिमंडळ अधिवेशनाकरिता केनच्या खुर्च्या विणण्याचे काम दृष्टिहीनांच्या संस्थांना देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने दृष्टिहीनांच्या दोन संस्थांना या कामाचे कंत्राट दिले आहे. हैदराबाद हाऊस व विधानभवन परिसरात दृष्टिहीन केनच्या खुर्च्या तयार करीत आहेत. मंत्री व मोठे अधिकारी हल्ली कुशनच्या खुर्च्या वापरतात, परंतु इतर कर्मचाऱ्यांसाठी आजही केनच्याच खुर्च्यांचा उपयोग केला जाताे. नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंडच्या विदर्भ युनिटचे महासचिव रेवाराम टेंभुर्णीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दृष्टिहीनांना केनच्या खुर्च्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. विधिमंडळ अधिवेशनाकरिता खुर्च्या तयार करीत असलेले दृष्टिहीन या कामात पारंगत आहेत. ते सामान्य व्यक्तीच्या तुलनेत वेगात काम करू शकतात.
उपजीविकेचे संकट : भीमराव वाडी
हैदराबाद हाऊस येथे खुर्च्या विणत असलेले भीमराव वाडी १९८४ पासून हे काम करीत आहेत. ते ज्ञानज्योती पुनर्वसन केंद्राशी जुळलेले आहेत. त्यांनी लहान खुर्ची दोन तासांत, तर मोठी खुर्ची चार तासांत तयार होते, अशी माहिती दिली, परंतु सध्या केनच्या खुर्च्या कमी वापरल्या जात असल्यामुळे कमाई घटली आहे. एक खुर्ची विणल्यानंतर केवळ १०० ते १५० रुपये मिळतात. एवढ्या तुटपुंज्या रकमेत उपजीविका चालविणे कठीण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.