रुग्णसेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी 'रुग्णकल्याण समिती'चा हातभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 16:42 IST2025-08-02T16:40:19+5:302025-08-02T16:42:14+5:30
Nagpur : काही जिल्ह्यात निधी असूनही समित्या कागदावरच अस्तित्वात असल्याचे चित्र

Contribution of 'Patient Welfare Committee' to improve the quality of patient care
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी व रुग्णांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या रुग्णकल्याण समित्या (आरकेएस) निधी असूनही केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे अनेक जिल्ह्यांतील चित्र आहे. परंतु, नागपुरात या समितीच्या नियमित बैठका होत असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत रुग्णसेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हातभार लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळत आहे. ही एक जमेची बाजू ठरली आहे.
जिल्ह्यातील सद्यस्थिती काय ?
जिल्ह्यातील अनेक ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णकल्याण समित्या आहेत आणि त्यांच्या नियमित बैठका होत आहेत.
रुग्णकल्याण समिती काय आहे?
रुग्णालयांच्या व्यवस्थापनात स्थानिक लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी रुग्णकल्याण समिती (आरकेएस) स्थापन करण्यात आली आहे. या समित्या रुग्णालयांना आत्मनिर्भर बनवून गरजांनुसार निर्णय घेण्यास सक्षम करतात. स्थानिक आमदार, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि लोकप्रतिनिधींचाही यामध्ये समावेश असतो.
राजकीय प्रतिनिधींचा सहभाग
या समित्यांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, जसे की आमदार आणि जिल्हा परिषदेचे सदस्य यांचा समावेश असतो. त्यांचा उद्देश आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवणे हा असतो.
समितीचे कार्य काय?
समिती रुग्णालयाला मिळालेल्या निधीचा योग्य वापर करते. उदा. नवीन वैद्यकीय उपकरणे खरेदी करणे, रुग्णालयाची दुरुस्ती करणे, स्वच्छतेचे साहित्य खरेदी करणे, रुग्णालयातील अडचणींवर चर्चा करून त्या सोडवण्यासाठी नियमित बैठका घेणे, रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योजना तयार करणे, आवश्यकतेनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे.
समितीमार्फत कुठे कुठे सुधारणा शक्य ?
निधीचा योग्य वापर झाल्यास रुग्णालयातील अनेक सोयीसुविधांमध्ये सुधारणा होऊ शकते. उदा. वैद्यकीय उपकरण खरेदी करणे, रुग्णालयांची स्वच्छता आणि देखभाल अधिक चांगली करणे, बसण्यासाठी खुर्चा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, रुग्णालयात सुरळीत वीजपुरवठा आणि आवश्यक त्या दुरुस्तीच्या कामांना गती देणे.
"रुग्णकल्याण समिती अंतर्गत प्रत्येक रुग्णालयात कार्यकारी समितीच्या बैठका व नियामक समितीच्या बैठका नियमित होत असतात. नियामक समितीच्या बैठकीत धोरणात्मक व निधीच्या वापरासंदर्भात निर्णय घेतले जात असल्याने रुग्णालयातील समस्यांचे निराकरण होण्यास मदत होते."
- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, नागपूर