उपराजधानीत संततधार : २४ तासात ५२.१ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 22:18 IST2020-08-28T22:16:41+5:302020-08-28T22:18:12+5:30
शुक्रवारी नागपुरात दिवसभर पावसाची हजेरी दिसून आली. कमीअधिक प्रमाणात पावसाचा जोर कायम होता. २४ तासात शहरात ५२.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

उपराजधानीत संततधार : २४ तासात ५२.१ मिमी पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी नागपुरात दिवसभर पावसाची हजेरी दिसून आली. कमीअधिक प्रमाणात पावसाचा जोर कायम होता. २४ तासात शहरात ५२.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यातदेखील दमदार पाऊस झाला. चौराई धरणाचे ९ गेट उघडल्यामुळे तोतलाडोह धरणाचे पूर्ण १४ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे आता पारशिवनी तालुक्यातील पेंच धरणाचे १६ गेट उघडण्यात आले. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. दुपारी काही वेळ मुसळधार पाऊस आला. सकाळी ८.३० वाजेपर्यंत शहरात १२.९ मिमी पावसाची नोंद झाली तर त्यानंतर १२ तासात ३९.२ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. पुढील ४८ तासात कमी-अधिक प्रमाणात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
पेंच ओव्हरफ्लो,१६ गेट उघडले
पारशिवनी तालुक्यातील पेंच धरणाचे १६ गेट उघडण्यात आले. पूर्ण गेट उघडण्यापूर्वी नदीशेजारील गावांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. शुक्रवारी सकाळी ४ गेट खुले होते .दुपारी २ वाजता पूर्ण १६ दरवाजे ०.५ मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता पूर्ण गेट २ मीटरने उघडण्यात आले. सायंकाळी ६.१५ वाजता ८ दरवाजे २ मीटरने तर इतर ८ दरवाजे २.५ मीटरने उघडण्यात आले. एकूण ३४४८.१६ क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू होता. यासोबतच पेंचचा डावा व उजवा कालवा उघडण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही पेंच धरण बघायला येऊ नये तसेच नदीशेजारील गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता प्रणय नागदेवे यांनी केले आहे.