समांतर वीज वितरण परवान्याला ग्राहक आणि 'एमएसईडीसीएल'चा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:18 IST2025-08-06T13:17:53+5:302025-08-06T13:18:23+5:30

Nagpur : 'एमईआरसी'ने घेतली ई-सार्वजनिक सुनावणी

Consumers and MSEDCL oppose parallel power distribution license | समांतर वीज वितरण परवान्याला ग्राहक आणि 'एमएसईडीसीएल'चा विरोध

Consumers and MSEDCL oppose parallel power distribution license

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) टॉरेंट पॉवर लिमिटेडच्या (टीपीएल) नागपूर शहर आणि आसपासच्या भागांसाठी समांतर वीज वितरण परवान्याच्या याचिकेवर मंगळवारी ई-सार्वजनिक सुनावणी घेतली. या सुनावणीत मोठ्या संख्येने ग्राहक आणि 'एमएसईडीसीएल'ने टॉरेंट पॉवरच्या या प्रस्तावाला जोरदार विरोध केला, तर सहा औद्योगिक संघटनांनी मात्र त्याला पाठिंबा दर्शविला.


सुनावणीदरम्यान, टॉरेंट पॉवरने सर्व आक्षेप फेटाळून लावत स्पर्धेच्या बाजूने दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला. ही सुनावणी 'एमईआरसी'चे अध्यक्ष संजय कुमार आणि सदस्य आनंद लिमये आणि सुरेंद्र बियाणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. टॉरेंटने नागपूर जिल्ह्यासोबतच मुंबई उपनगर आणि पुणे जिल्ह्यांसाठीही अशाच याचिका दाखल केल्या आहेत, ज्यांना अनेकांनी विरोध केला आहे. त्यात 'एमएसईडीसीएल'च्या विविध युनियन्सच्या प्रतिनिधींचा समावेश होता. विशेष म्हणजे, 'एमएसईडीसीएल'च्या याचिकांना नेहमीच विरोध करणारी 'प्रयास एनर्जी ग्रुप' (पीईजी) या संस्थेनेही टॉरेंटला विरोध केला. 'पीईजी'चे प्रतिनिधी शांतनू दीक्षित यांनी सांगितले की, अशा परिस्थितीत परवाना देणे घाईचे ठरेल. त्यांनी टॉरेंटच्या याचिकेत समांतर परवान्यामुळे निर्माण होणाऱ्या काही मूलभूत आव्हानांचा पुरेसा विचार केला नसल्याचे नमूद केले. फक्त नफ्याचे ग्राहक निवडणे, नेटवर्कची नक्कल आणि वीज खरेदीच्या नियोजनातील गुंतागुंत यांसारख्या गंभीर समस्या अनुत्तरित आहेत आणि कोणत्याही परवान्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी यावर सखोल तपासणी होणे आवश्यक आहे, असे सांगत दीक्षित यांनी 'एमईआरसी'ला ही याचिका फेटाळून लावण्याची विनंती केली.


का केला विरोध ?
'एमएसईडीसीएल'नेसुद्धा या याचिकेला विरोध केला. टॉरेंटला परवाना मिळाल्यास 'एमएसईडीसीएल'ला अतिरिक्त वीज खरेदी करार आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागेल. टॉरेंट फक्त जास्त नफा देणाऱ्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करील, ज्यामुळे निवासी आणि कृषी ग्राहकांना मिळणारी क्रॉस-सबसिडी व्यवस्था धोक्यात येईल, पायाभूत सुविधांचा गैरवापर होईल, असे 'एमएसईडीसीएल'ने सार्वजनिक हिताचे रक्षण करण्यासाठी या प्रस्तावाला विरोध केला.


टोरेंट पॉवर उपक्रमाचे स्वागत
टॉरेंट पॉवर लिमिटेडच्या (टीपीएल) नागपूरमध्ये समांतर वीज वितरण परवाना मिळवण्याच्या प्रस्तावाचे नागपूर जिल्ह्यातील सहा औद्योगिक संघटनांनी स्वागत केले आहे. उद्योगांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर (एमईआरसी) झालेल्या सुनावणीत स्पर्धा वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. आर.बी. गोएंका यांनी सहा औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधित्व करताना सांगितले की, वीज क्षेत्रातील 'एमएसईडीसीएल'ची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी समांतर वितरण परवान्याची आवश्यकता आहे. यामुळे वीज क्षेत्रात स्पर्धा निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. गोएंका यांनी वीज कायदा, २००३ मधील कलम १४ चा संदर्भ देत एकाच वितरण क्षेत्रात एकापेक्षा जास्त परवानाधारक असू शकतात, असे स्पष्ट केले. त्यांनी कलम १४ मधील तरतुदीनुसार, अर्जदाराने भांडवली पर्याप्तता, पतपुरवठा क्षमता आणि आचारसंहितेचे पालन केले असेल, तर आयोगाने परवाना मंजूर करावा. यापूर्वीच एका कंपनीला परवाना दिला आहे, म्हणून नव्या कंपनीला तो नाकारता येणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. गोएंका यांनी आयोगाला विनंती केली की, टॉरेंट पॉवरला परवाना तात्काळ मंजूर करावा. तांत्रिक, व्यावसायिक किंवा दराशी संबंधित इतर कोणतेही मुद्दे नंतरच्या टप्प्यात, म्हणजेच टॉरेंट पॉवरची एकूण महसूल गरज आणि दर निश्चित करताना विचारात घेतले जाऊ शकतात, असे त्यांनी सुचवले. या टप्प्यावर तांत्रिक आणि इतर समस्या उपस्थित करणे गैरलागू आहे, यावर त्यांनी भर दिला.

Web Title: Consumers and MSEDCL oppose parallel power distribution license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.