ग्राहक आयोगाची एसएलपीएल कन्स्ट्रक्शनला चपराक; तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे आदेश दिले
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: September 26, 2022 18:08 IST2022-09-26T18:06:58+5:302022-09-26T18:08:08+5:30
या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी एसएलपीएल कन्स्ट्रक्शनला ४५ दिवसाची मुदत देण्यात आली आहे.

ग्राहक आयोगाची एसएलपीएल कन्स्ट्रक्शनला चपराक; तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे आदेश दिले
नागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे एस. एल. पी. एल. कन्स्ट्रक्शन कंपनीला चपराक बसली.
तुषार झंजाडे, असे ग्राहकाचे नाव असून ते भंडारा येथील रहिवासी आहेत. उर्वरित ३० लाख रुपये स्वीकारून झंजाडे यांना त्यांनी खरेदी केलेल्या फ्लॅटचे नोंदणीकृत विक्रीपत्र करून द्या. कायदेविषयक किंवा तांत्रिक कारणांमुळे विक्रीपत्र नोंदवून देणे अशक्य असल्यास झंजाडे यांना त्यांचे दहा लाख रुपये १२ टक्के व्याजासह परत करा, तसेच झंजाडे यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई अदा करा, असे आदेश आयोगाने एसएलपीएल कन्स्ट्रक्शनला दिले आहेत.
संबंधित व्याज १५ जून २०१३ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी एसएलपीएल कन्स्ट्रक्शनला ४५ दिवसाची मुदत देण्यात आली आहे. प्रकरणावर आयोगाचे अध्यक्ष अतुल आळसी, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
झंजाडे यांनी एसएलपीएल कन्स्ट्रक्शनच्या चिंचभुवन येथील योजनेतील एक फ्लॅट ४० लाख रुपयांत खरेदी करण्यासाठी ३० जून २०१४ रोजी करार केला व कंपनीला वेळोवेळी एकूण दहा लाख रुपये अदा केले. परंतु, योजनेच्या ठिकाणी २०१६ पर्यंत काहीच बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे झंजाडे यांनी रक्कम परत मागितली. कंपनीने त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. परिणामी, झंजाडे यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.