लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरमेट्रोच्या ऑरेंज लाइनच्या दुसऱ्या विस्तार टप्प्यात रिच-२ ई मध्ये पहिल्या स्पॅनचे यशस्वीरीत्या लाँचिंग करण्यात आले. रिच-२ई ची एकूण लांबी ६.०१६ किमी असून, लेखानगर (आशा हॉस्पिटल) ते कन्हान नदी मेट्रो स्टेशनपर्यंत हा विस्तार आहे. हा टप्पा २४ महिन्यांत पूर्ण होणार आहे.
लॉचिंगप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक (प्रकल्प) राजीव त्यागी, कार्यकारी संचालक अरुणकुमार, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रीच-२) विद्यासागर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा महत्त्वाचा कॉरिडॉर नागपूर शहराच्या उत्तरेकडील भागात लास्ट माईल कनेक्टिव्हीटी सुधारण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे कँटोन्मेंट, शाळा, हॉस्पिटल्स, बसस्थानके शहरी भागांशी जोडली जातील. ऑरेंज लाइनचा हा विस्तार एकूण १२ किमी लांबीचा असून ऑटोमोटिव्ह चौक ते साई मंदिरदरम्यान (कन्हान नदी) कनेक्टिव्हिटी राहील.
रिच-२ चा विस्तार २अ आणि रई या दोन भागांत विभागला आहे. रिच-२अ मध्ये पिली नदी, खसरा फाटा, ऑल इंडिया रेडिओ, खैरी फाटा, लोकविहार, लेखानगर आणि रिच-२ई मध्ये कँटोन्मेंट, कामठी पोलिस स्टेशन, कामठीनगर परिषद, ड्रॅगन पॅलेस, गोल्फ क्लब आणि कन्हान नदी मेट्रो स्टेशनचा समावेश आहे.
प्रथम २५ मीटर लांबीच्या स्पॅनमध्ये ९ सेगमेंट्स आहेत आणि या सेगमेंट्सची उभारणी 'सह्याद्री' नावाच्या लाँचिंग गर्डरच्या साहाय्याने करण्यात आली. या पहिल्या स्पॅनची लाँचिंग हे फेज-२ च्या वेळेवर व यशस्वी अंमलबजावणीच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.